करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्यात आलं. मात्र, पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात आणि अध्यक्षांच्या चेंबरमध्ये देखील राडा घातला. याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी देखील विधानसभेत दिसून आले. कालच्या प्रकारानंतर भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केल्यानंतर त्याचा निषेध म्हणून भाजपानं कामकाजावर बहिष्कार टाकत आज सभागृहाबाहेर प्रतिसभागृह भरवलं. या प्रकारामुळे आजही दिवसभर सभागृहातलं वातावरण तणावपूर्णच पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी विरोधकांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “कालच्या घटनेचा व्हिडीओ जर पाहिला, तर आपल्या सगळ्यांची मान शरमेनं खाली जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कालची घटना अशोभनीय…
यावेळी बोलताना अजित पवार यांनी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांच्या दालनात जे घडलं, त्याला अशोभनीय म्हटलं आहे. “सभागृहात सगळ्यात वरीष्ठ बाळासाहेब थोरात आहेत. १९८५मध्ये ते संगमनेरमध्ये निवडून आले आहेत. त्यांनीही सभेतल्या सगळ्या बाबी बघितल्या. आम्हीही अनेक मुख्यमंत्र्यांना सभागृहात बघितलं. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, मनोहर जोशी अशा अनेकांची कारकिर्द बघितली. कधी सत्तेत होते, कधी विरोधात होतो. पण सभागृहाचं पावित्र्य नेहमी राखलं गेलं. कधीकधी मतभेद झाले. आम्हीही विरोधी पक्षात असताना आमचे १९ आमदार निलंबित केले. आम्ही हल्लाबोल आंदोलन सुरू केलं. पण कालची गोष्ट अशोभनीय होती”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
हा तर भास्कर जाधवांचा मोठेपणा!
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी सोमवारी अध्यक्षांच्या दालनात भास्कर जाधवांनी सांगितल्यापेक्षाही बरंच काही घडल्याचं म्हटलं आहे. “काल एकदम विरोधी पक्षाचा तोल गेला आणि ते इतके अस्वस्थ झाले की त्यांचं त्यांच्यावरच नियंत्रण राहिलं नाही. काही माजी मंत्री देखील अध्यक्षांच्या समोर गेले. हे सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांच्या चेंबरमध्ये एवढं काही घडलं. भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं. खरंतर त्याहून बरंच काही घडलं. काही जण त्यांच्या थेट अंगावर धावून गेले. हे त्यांनी सांगितलं नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
नंतर सारवासारव केली, पण…
यावेळी अजित पवारांनी विरोधी पक्षावर परखड टीका केली. “विरोधी पक्षांनी हे सगळं मान्य केलं. आशिष शेलार वगैरे यांनी मान्य केलं, नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. पण अध्यक्षांच्या दालनात जे घडलं, त्याचा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला, तर अक्षरश: आपली मान शरमेनं खाली जाईल”, असं अजित पवार म्हणाले.
काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं – मुख्यमंत्री
विरोधकांनी पवित्र मंदिराचा अपमान केला
“कालचा गोंधळ कमी वाटला म्हणून की काय आज विधिमंडळाच्या बाहेर प्रतिविधानसभा आयोजित केली. आम्ही कधीकधी सभागृहात केलं आहे. काही बाबतीत विस्कळीतपणा असायचा. पण आज विरोधकांनी प्रतिसभागृह करून माईकचा वापर केला. त्याची परवानगी अध्यक्षांकडून घेतली नाही. विरोधी पक्षांनी या पवित्र मंदिराचा अपमान केला. आज पुन्हा अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट अध्यक्षांच्या समोर जाऊन राजदंड पळवला. काही नियम असतात. सर्वोच्च न्यायालयानं देखील संसद आणि विधानसभेत बेलगाम वागणाऱ्या सदस्यांविरोधात खटला भरायला हवा, असं म्हटलं आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
Exclusive Interview : अधिवेशनात नक्की घडलं काय?; सांगतायत भास्कर जाधव
रवी राणांना वेगळंच वातावरण करायचं होतं…
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवणाऱ्या रवी राणा यांच्यावर देखील निशाणा साधला. “आज ३ ते ४ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती तिथे येते. अशा रीतीने राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत कालचं घडल्यानंतर त्यात आज भर घालण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं. आजही भास्कर जाधवांनी रवी राणांच्या बाबतीत समंजसपणाची भूमिका घेतली. पण त्यांना प्रश्न मांडण्यापेक्षा वेगळं वातावरण तयार करायचं होतं, असाच त्यांचा पवित्रा पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं”, असं अजित पवारांनी सांगितलं.