मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी अखेर मुहुर्त मिळाला आहे. ११ जूनला या दुकानांचा ई लिलाव केला जाणार आहे. या ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान १२५ कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा आहे.
मुंबई मंडळाने आपल्या गृप्रकल्पातील दुकानांच्या ई लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेत फेब्रुवारीत १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. तर १ मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती, बोली निश्चिती अशा प्रक्रियेस सुरुवात केली. जाहिरातीनुसार २० मार्चला दुकानांचा ई लिलावा होणार होता. मात्र त्याआधीच मुंबई मंडळाने दुकानांचा २० मार्चचा ई लिलाव रद्द करत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली निश्चितीला मुदतवाढ दिली. आचारसंहिता आणि ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ५ जूनपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली. तर मुदतवाढ देताना ई लिलावाची तारीख मात्र जाहीर केली नाही. पण आता मात्र आचार संहिता संपुष्टात येणार असून ५ जूनची मुदतही संपणार आहे. त्यामुळे आता ई लिलावासाठी मंडळाने तारीख निश्चित केली आहे.
हेही वाचा – मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरुन आतापर्यंत दहा कोटी प्रवाशांचा प्रवास
११ जूनला १७३ दुकानांचा ई लिलाव होणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर १७३ दुकानांना कसा प्रतिसाद मिळाला आहे, किती अर्ज दाखल झाले आहे हे ५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे.