मुंबई: विक्रोळी येथील बस थांब्यावर पहाटे उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा ई – बाईक टॅक्सीचालकाने विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

छत्रपती संभाजी नगर येथे राहणारी ही पीडित २२ वर्षीय तरुणी १३ एप्रिलला खासगी बसने विक्रोळी येथे राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांकडे आली होती. बसमधून उतरल्यानंतर तिला घेण्यासाठी नातेवाईक येणार होता. त्यामुळे काही वेळ ती बस थांब्यावर उभी होती. याच वेळी तेथे ई – बाईक टॅक्सीचालक उदय सुरेश खांबे (३७) आला. तरुणी एकटीच बस थांब्यावर उभी असल्याचे पाहून त्याने तिचा विनयभंग केला. यावेळी तरुणीने आरडाओरडा करताच आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.घाबरलेल्या तरुणीने घरी गेल्यानंतर ही बाब नातेवाईकांना सांगितली.

नातेवाईकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यासाठी पोलिसांनी परिसरातील ३०० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आरोपीचा चेहरा कैद झाला होता. पोलिसांनी आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.