वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना देण्यात येणारे कागदी चलान लवकरच इतिहासजमा होणार आहे. मुंबई-नागपूरमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘ई-चलान’ प्रणालीची अंमलबजावणी आता राज्यातील सर्वच २६ महापालिकांमध्ये सुरू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा जबरी दंड भरण्याबरोबरच परवाना निलंबित आणि रद्द करण्यासारख्या गंभीर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना सध्या कागदी चलान दिले जाते. त्यामुळे एकाद्या वाहन चालकाने कितीवेळा वाहतुकीचे नियम मोडले याची काहीच मोजदाद होत नाही. मात्र ही जुनी पद्धती लवकरच बंद होणार आहे. सध्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या त्या ठिकाणी उपस्थित असलेला वाहतूक पोलिसांकडून ई-चलान देताना रोखीने दंड घेतला जातो. त्यातून एखाद्या व्यक्तीने कितीवेळा नियमभंग केला आहे, याची काहीच नोंद होत नाही. शिवाय नियम मोडला तरी त्याचाही बोध होत नाही. त्यामुळे वाहनचालकाने अनेकवेळा नियम मोडल्यानंतरही त्याला अधिक दंड किंवा परवाना निलंबनाची शिक्षा होत नाही.
मात्र लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये ई-चलान प्रणाली लागू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला असून येत्या दोन- तीन महिन्यात त्याची सर्व महापालिकांमध्ये अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी ‘लोकसत्ता’स दिली. त्यानुसार ज्यांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड झाला आहे, त्यांची माहिती एकत्र करण्यात आली आहे. आता २६ महापालिका क्षेत्रातील वाहतूक पोलिसांकडे ई-चलान मशीन देण्यात येणार असून एकाद्याने नियम मोडल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलीस त्याला दंडाची आकारणी करेल. मात्र हा दंड डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरण्याची मुभा लोकांना देण्यात येणार आहे. एखाद्या वाहनचालकाने कितीवेळा वाहतुकीचे नियम मोडले याची सर्व नोंद या मशीनमध्ये होणार आहे. त्यामुळे यापुढे वांरवार नियम मोडणाऱ्यांचे परवाने निलंबित किंवा रद्दही करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
- ई-चलान प्रणालीत वाहतूक नियम मोडणाऱ्याचा फोटो काढला जाणार असून त्याची स्वाक्षरीही घेतली जाणार. तसेच वाहनचालकाचा परवाना क्रमांक, भ्रमणध्वनी, ई-मेल आदी नोंदविला जाणार आहे.