जूनपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडे ई-चलान उपकरणे; दंड आकारताना चालकाच्या नाव, पत्त्याचीही नोंद
सिग्नल मोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे असे प्रकार वारंवार करणाऱ्यांची आता खर नाही. मुंबई वाहतूक पोलिसांकडे जूनपासून आधुनिक ई-चलान यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. तसेच या उपकरणांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार असून वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई केली जाणार आहे.
विविध वाहतूक नियमभंगाप्रकरणी वाहनचालकांना १०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येतो. यासाठी चालकांना दंडाची पावतीही दिली जाते. मात्र, या पावत्यांची एकत्रितपणे नोंद ठेवण्याची कोणतीही यंत्रणा आतापर्यंत वाहतूक पोलिसांकडे नव्हती. परिणामी, वाहतूक नियमभंग करण्याची ‘सवय’ जडलेल्या वाहनचालकांची नियमित दंडावरच सुटका होत होती. परंतु, आता ई चलान पद्धत मुंबई वाहतूक पोलीस राबवणार असून त्या यंत्रणेत नियमभंग करणाऱ्या चालकांची माहिती एकत्रितपणे संचयित केली जाणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीने त्याच प्रकारचा नियमभंग पुन्हा केल्यास न्यायालयासमोर ही बाब मांडून सदर चालकावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी योजना आहे.
ई-चलान पद्धत जून २०१६पासून मुंबईत राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले. ही पद्धत राबविण्यासाठी पोलिसांकडे १००० ई-चलान यंत्रे देण्यात येतील. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलीस पकडतील तेव्हा त्याच्याकडे असलेले क्रेडिट-डेबिट कार्ड स्वाइप करून पावती देण्यात येईल, यामुळे पावती हाताने लिहिण्याचा वेळ, रोख पसे घेऊन ते दिवसभर बाळगून दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करण्याचा व्यापही कमी होणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणांतील माहितीही संगणकीकृत करण्यात वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ई-चलान पद्धत सुरू झाल्यानंतर ती माहितीही कारवाई करताना पोलिसांकडे उपलब्ध असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा