मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल झालेल्या विजेवर धावणाऱ्या शिवनेरीला एक महिना पूर्ण झाला असून सध्या मुंबई – पुणे आणि ठाणे – पुणे या मार्गावर २६ ई – शिवनेरी बस धावत आहेत. एका महिन्यात ५० हजार प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला असून ई – शिवनेरीमुळे एका महिन्यात एसटीच्या तिजोरीत २ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. घाटावर चालणारी पर्यावरण पूरक, अत्याधुनिक, वातानुकूलित बस अशी ई – शिवनेरीची ओळख बनली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे २०२३ रोजी ई – शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले होते. सुरुवातीला ठाणे – पुण्यादरम्यान ई-शिवनेरी फेरी सुरू झाली. त्यानंतर १९ मेपासून दादर – पुणे ई-शिवनेरी सेवा सुरू झाली. पहिल्या दिवसापासून ई – शिवनेरीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एका महिन्यात ५० हजारांहून अधिक प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला असून एसटीला २ कोटी रुपये उत्पन्न मिळाला आहे. लवकरच १०० ई – शिवनेरी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून या बसच्या माध्यमातून हजारो प्रवाशांना सुरक्षित, प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवासी सेवा देण्याचा एसटीचा मानस आहे.