मुंबई : गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर विद्युत अर्थात ‘इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी डिसेंबरपासून सेवेत दाखल होणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गेट ऑफ इंडिया ते बेलापूर अंतर केवळ एका तासात पार करता येईल. या प्रवासासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जाणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न मुंबई सागरी मंडळ, तसेच मुंबई बंदर प्राधिकरण करीत आहे. त्याचाच भाग म्हणून ‘रो रो’ सेवा आणि ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू करण्यात येत आहेत. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून दीड-दोन वर्षांपूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रतिसादाअभावी ती बंद पडली होती. असे असताना आता गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी विद्युत अर्थात इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>>मुंबई : कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘आश्रय आवास’ योजनेत अडथळा बनलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा
प्रदुषणाच्या समस्येचा विचार करून ‘ई वॉटर टॅक्सी’चा पर्याय पुढे आणण्यात आला. त्यानुसार या सेवेसाठी दीड-दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. गोव्यात चार ‘ई वॉटर टॅक्सी’ची बांधणी करण्यात येत आहे. आतापर्यंत चारपैकी दोन वॉटर टॅक्सीची बांधणी पूर्ण झाली असून लवकरच दोन ई वॉटर टॅक्सी इन्फिनिटी हार्बर सव्र्हिस या खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात दोन ई वॉटर टॅक्सी दाखल झाल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ही दैनंदिन जलवाहतूक सेवा सुरू होईल, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सव्र्हिसचे मालक सोहेल कझानी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र भविष्यात गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर व्हाया एलिफंटा अशी ई वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्यात चाचणी..
चारपैकी बांधणी पूर्ण झालेल्या २४ प्रवासी क्षमतेच्या दोन वॉटर टॅक्सीची चाचणी गोव्यात सुरू आहे. सध्या गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर आणि जेएनपीटी सेवेसाठी मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे. आता गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा सेवेची परवानगी बाकी आहे. ही परवानगी मिळाल्यास आणि उर्वरित दोन वॉटर टॅक्सी उपलब्ध झाल्यास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा सेवा सुरू होईल, असे सोहेल कझानी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे शस्त्रक्रियागृह सोमवारपासून बंद
दररोज १० फेऱ्या ..
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेऱ्या होतील.
परवडणारी सेवा..
विजेवर चालणाऱ्या या वॉटर टॅक्सीचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही सेवा आर्थिकदृष्टय़ा परवडणारी आहे, असे इन्फिनिटी हार्बर सव्र्हिसचे मालक सोहेल कझानी यांनी सांगितले. अर्धा तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ही वॉटर टॅक्सी किमान सहा तास चालेल. ई वॉटर टॅक्सीमुळे प्रदुषणालाही आळा बसेल.
वेगवान प्रवास..
’चारपैकी दोन ई वॉटर टॅक्सी २४ प्रवासी क्षमतेच्या, एक वॉटर टॅक्सी
१०, तर एक सहा प्रवासी क्षमतेची आहे.
’२४ प्रवासी क्षमतेच्या दोन ई वॉटर टॅक्सी डिसेंबरमध्ये जलवाहतूक सेवेत दाखल होतील.
’ई वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान आहेत. त्यामुळे बेलापूरला एका तासात, तर एलिफंटाला अध्र्या तासात पोहोचता येईल.