पावसाने जोरदार हजेरी लावताच राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील रस्त्यांवर खड्डय़ांचीही हजेरी लागली आहे. पावसाळ्यातील तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीसाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र रस्ते दुरुस्ती योग्य प्रकारे न झाल्याने सर्वत्र खड्डय़ांचे दर्शन घडत आहे. महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदारांच्या भ्रष्ट साखळीमुळे २५० कोटी रुपये खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे. आता खड्डे दुरुस्तीची कोटय़वधींची कामे घाईने पूर्ण करण्याचे ‘कर्तव्य’ही नजरेच्या टप्प्यात आल्याने निविदांच्या लगीनघाईसाठी ही साखळी निर्लज्जपणे सरसावली आहे.
महापालिकांच्या अंदाजपत्रकात दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठीदेखील कोटय़वधींची तरतूद केली जाते. विशेषत: पावसाळ्यात खड्डे पडले की जनतेचा आक्रोश होण्याचीच वाट पालिकेचे अधिकारी पाहत असतात. खड्डे दुरुस्ती तसेच डांबरीकरण यासाठी कोटय़वधींच्या निविदा झटपट मंजूर करून भ्रष्ट यंत्रणा या परिस्थितीचाही फायदा उठवत असल्याचे चित्र राज्यभर आहे.
पुणे : सलग व जोरदार पाऊस झाला, की शहरातील बहुतेक रस्ते खड्डेमय होतात. यंदाही हीच परिस्थिती आहे. खड्डे दुरुस्तीसाठी ७० ते ७५ कोटी रुपयांची तरतूद केलेली असते आणि ती सगळी खर्चही होते. मात्र, तरीही रस्त्यांवर खड्डे पडतात.
नाशिक : रिमझिम पावसानेच नाशिकमधील रस्ते उखडण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रस्त्यांची काय अवस्था होईल याची भीती आता वाहनचालकांना वाटत आहे. गेल्या वर्षी रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर १० कोटी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेचा यंदाचा हा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज आहे.
नागपूर, अमरावती : संततधार पावसामुळे नागपुरातही अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसू लागले आहे. गेल्या वर्षी फक्त खड्डे दुरुस्तीसाठी ४५ कोटींची तरतूद के ली होती. यंदा खड्डे दुरुस्ती व अन्य कामांसाठी ९४ कोटींची तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अमरावतीतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती; पण त्या रस्त्यांसाठी आलेल्या २० कोटींच्या निधीपैकी १० कोटींचा निधी सुस्थितीतील रस्त्यांवरच खर्च होत असल्याचा अजब प्रकार अमरावतीकरांना पाहायला मिळाला.
सोलापूर : सुवर्ण महोत्सवी वर्षांतील सोलापूर महापालिकेने रस्ते विकासासाठी पावले उचलली असली, तरी शहरातील खराब व नादुरुस्त रस्त्यांचा प्रश्न सोलापूरकरांना भेडसावतच आहे. या रस्त्यांच्या दर्जाबद्दलही कोणीही समाधानी नाही. एकीकडे रस्ते विकास आणि दुसरीकडे खोदाई ही कामे शहरात एकाच वेळी सुरू आहेत.
कोल्हापूर, सांगली : कोल्हापूरमध्ये दरवर्षी रस्तेनिर्मितीवर २० कोटी आणि फक्त खड्डे बुजवण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केले जातात. सांगलीमध्ये महापालिकेने रस्ते दुरुस्तीवर दीड कोटी रुपये खर्च केले. राजकीय कारणांमुळे रस्त्यांची कोणतीही कामे ठेकेदारांकडून गुणवत्तापूर्ण झालेली नसल्याचे चित्र आहे.
मुंबई
रस्त्यांची चाळण झाली असून असून अनेक ठिकाणचे पेव्हर ब्लॉकही उखडले आहेत. त्यातच भर म्हणून पदपथांनाही खड्डे पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंदा खड्डे दुरुस्तीसाठी २८ कोटींची तरतूद आहे; पण रस्तोरस्ती पडलेले खड्डे पाहता यंदाही मोठा खर्च करण्याची संधी या साखळीला लाभली आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण
ठाण्यात आणि नवी मुंबईत महत्त्वाचे बहुतेक रस्ते नवे केलेले असल्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत इथे बरी परिस्थिती आहे. काही प्रमाणात रस्त्यांना खड्डे दिसत असले, तरी वाताहत म्हणावी अशी परिस्थिती नाही. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मात्र दर वर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा