मुंबई : यंत्रमानवांचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये होत असताना शैक्षणिक क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. ‘आयआयटी मुंबई’तील टेक फेस्ट या तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये ‘ईगल’ हा यंत्रमानव भेटीला आला आहे. हा यंत्रमानव चक्क विद्यादान करतो. पुणे, बंगळूरु आणि तेलंगणामध्ये याचा वापर सुरू करण्यात आला असून शिक्षक उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागांमध्ये हा ‘यंत्रशिक्षक’ भविष्यात उपयुक्त ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून शहाणे करण्याचे काम शिक्षकांचे असते. येत्या काही वर्षांत ही जबाबदारी यंत्रमानवांनी आपल्या खांद्यावर घेतली, तर आश्चर्य वाटायला नको. ‘ईगल रोबो लॅब’ या भारतीय कंपनीने हा यंत्रमानव तयार केला आहे. सध्या हा रोबो वर्गांमध्ये सहाय्यक शिक्षकाची भूमिका बजावत आहे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तो अचूक उत्तरे देतो. तो इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ यासह परदेशी भाषांमधून संवाद साधू शकतो. ‘ईगल’कडून धडे गिरविताना विद्यार्थ्यांनाही मजा येते, असे ‘ईगल रोबो लॅब’चे संचालक विग्नेश राव यांनी सांगितले. पुण्यासह कर्नाटक आणि तेलंगणात सुमारे ४० यंत्रशिक्षक सध्या विद्यादान करीत आहेत. पुण्यातील इंडस आंतरराष्ट्रीय शाळेत १० ‘ईगल’ कार्यरत आहेत.
हेही वाचा >>>‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान कोण पटकावणार? २१ डिसेंबरला मुंबईत महाअंतिम फेरी सोहळा
आम्ही ‘ईगल’ अधिक अद्ययावत करीत असून त्याला ‘ईगल ७’ असे नाव देण्यात आले आहे. हा नवा यंत्रमानव फेब्रुवारीपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.- विग्नेश राव, संचालक, ‘ईगल रोबो लॅब’