शाळांच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेसच्या चालक आणि वाहकांना १ जानेवारीपासून पान-तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मनाई हुकूम तोडणाऱ्या कंत्राटदारांचा वाहन परवाना रद्द करण्याची सूचना स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.
पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांच्या विरोधात आता सर्वच वाहतूक यंत्रणांनी कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. रेल्वेने अशा पद्धतीने थुंकणाऱ्यांच्या विरोधात ५०० रुपये दंडाची शिक्षा जाहीर केली असून कारवाईचे अधिकार तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुखांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना च्युइंगगम खाण्यास शाळांनी मनाई केली आहे. बेस्टनेही पान-तंबाखू खाणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे जाहीर केले असून आता शाळांच्या बसेसच्या चालक-वाहकांनाही १ जानेवारीपासून पान-तंबाखू खाण्यास स्कूल बस ओनर्स असोसिएशनने मनाई केली आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनीच हातभार लावावा. आपल्या कृत्याचे अनुकरण शाळांमध्ये जाणारी मुले करीत असतात, याचे भान बाळगावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी आपल्या सदस्य चालक-वाहकांना केले आहे. मुंबईमध्ये या असोसिएशनचे १० हजार सदस्य असून राज्यात ४२ हजार सदस्य आहेत.
गर्ग यांनी या बंदीबाबत सांगितले की, मुंबईतील विविध विभागातील लायन्स क्लबनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक बसमध्ये याबाबतची पत्रके लावण्यात येतील. त्याचप्रमाणे चालक-वाहक पान-तंबाखू खाऊन थुंकत नाही, याकडे विद्यार्थी लक्ष ठेवतील आणि असे कोणी आढळले तर त्यांच्या विरोधात गाडीमध्ये लावण्यात येणाऱ्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवतील. यानंतर संबंधित व्यक्तीला समज देण्यासाठी संबंधित बसच्या कंत्राटदाराला सांगण्यात येईल. दोन ते तीन वेळा समज दिल्यानंतरही पान-तंबाखू खाणे थांबले नाही तर संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याबाबत परिवहन विभागाला शिफारस करण्यात येईल, असे गर्ग यांनी सांगितले. एखाद्या शाळेच्या बसचा चालक किंवा वाहक कामावर असताना थुंकताना आढळला तर नागरिकांनीही  buscomplaint@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करावी, असे गर्ग यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा