वृक्षारोपण, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि मदत
मुंबई : मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ आणि कलानिधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत १२ ऑगस्टला एकाच वेळी २५ ठिकाणी वाद्यवृंदसृष्टीतील कलावंत एक हजार वृक्षांची लागवड करणार आहेत, तर सामाजिक बांधिलकी जपत समुद्रकिनाऱ्यांची साफसफाईही करणार आहेत.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे या वर्षी गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जन्माष्टमीचे निमित्त साधत काही वृक्षप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन अनोखा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीमुळे वाद्यवृंदसृष्टीतील कलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. निराशा झटकून नवी उमेद मिळावी म्हणून या उत्सवात कलावंतांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
एकूण २५ पथके तयार करण्यात येणार असून मुंबईच्या विविध भागांत ही २५ पथके १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत एक हजार देशी झाडांची लागवड करणार आहेत. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील उड्डाणपुलाशेजारी याच दिवशी सकाळी ८ वाजता कलावंत आणि ज्येष्ठ वृक्षतज्ज्ञ विक्रम यंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एक हजार वृक्षारोपण झाल्यानंतर कलावंत मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची साफसफाई करणार आहेत.
बेरोजगार झालेल्या कलावंतांना गणेशोत्सवात मिष्टान्न तयार करता यावे यासाठी १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी अन्नधान्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यानंतर अनेक वेळा कागदाचे, प्लास्टिकचे लहान राष्ट्रध्वज, बिल्ले रस्त्यावर कचऱ्यात आढळतात. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी हीच कलावंत मंडळी रस्त्यावर पडलेले कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, बिल्ले गोळा करणार आहेत.
गणेशोत्सव म्हणजे या कलावंतांना आपली कला सादर करण्याचा आणि बिदागी मिळविण्यासाठी पर्वणीचा उत्सव; परंतु यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे या कलावंतांनी ठिकठिकाणच्या मंडळांच्या मंडपात जाऊन करोनाविषयी प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोविंदा पथकांना आवाहन
गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सव रद्द करून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर श्रीकृष्णाच्या आवडीच्या कदंब, कृष्णवड, मुचकुंद, पारिजातक आदी वृक्षांची लागवड करून जन्माष्टमी साजरी करण्यासाठी वृक्षप्रेमींच्या ‘ग्रीन अंब्रेला’ संस्थेने मुंबईतील गोविंदा पथकांना साद घातली आहे. दरवर्षी निरनिराळ्या उत्सवांच्या निमित्ताने वृक्षलागवड करणाऱ्या ‘ग्रीन अंब्रेला’ संस्थेनेही गोिवंदा पथकांना साद घातली आहे. श्रीकृष्णाच्या आवडीच्या वृक्षांची लागवड करून जन्माष्टमी साजरी करावी, असे आवाहन ‘ग्रीन अंब्रेला’चे वृक्षतज्ज्ञ विक्रम यंदे यांनी केले आहे.