प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील विविध संघटना यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘मिशन ग्रीन मुंबई’ या संस्थेने ‘झाडांसोबत सेल्फी’, तर बॉन्झार वर्ल्ड या पर्यटन कंपनीने ‘फटाक्यांना नकार’ हा उपक्रम सुरू केला आहे. या संदर्भात जनजागृती केली जात असून उपक्रमांना पर्यावरणप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचा संकल्प अनेकांनी सोडला आहे.

दिवाळीमध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होते. हे टाळण्यासाठी विविध पर्यावरणस्नेही संस्था सरसावल्या आहेत. मिशन ग्रीन या संघटनेने ‘एक सेल्फी झाडाबरोबर’ (सेल्फी विथ ट्री) हा उपक्रम सुरू केला आहे. बुधवारपासून हा उपक्रम सुरू झाला असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबाबत मिशन ग्रीनचे प्रमुख शुभोजित मुखर्जी यांनी सांगितले की, मुंबईतील झाडांची काळजी घेतली जात नाही. त्यांची पडझड होते. त्यामुळे नागरिकांनी झाडांची काळजी घ्यावी, झाडे दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन करावे यासाठी ‘सेल्फी विथ ट्री’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याला समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. झाडांबरोबर सेल्फी काढून कोणत्याही समाजमाध्यमावर पोस्ट करावा आणि त्यात हरित दिवाळीसंबंधी ‘हॅश टॅग’ द्यावा असा हा उपक्रम आहे.

याशिवाय ज्यांना झाडे दत्तक घेण्याची इच्छा आहे अशा नागरिकांना रोपटय़ांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. एका दिवसात १०० रोपटय़ांचे वाटप करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. झाडांसोबत सेल्फी काढून पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मिशन ग्रीन मुंबईने केले आहे.  खऱ्या अर्थाने हरित दिवाळी साजरी करण्यासाठी ‘फटाक्यांना नाही म्हणा’ अर्थात, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. घाटकोपरमधील बॉन्झार वर्ल्ड या ट्रॅव्हल कंपनीने ‘से नो टी क्रॅकर्स’ असा उपक्रम फेसबुकवर सुरू केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी अनेक देशांमध्ये र्निबध घातलेले आहेत. तसेच आपल्या देशातही व्हावे  म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संचालक शुभम गुप्ता यांनी दिली.

जोगेश्वरीतील काही मित्रमंडळींनी १० वर्षांपासून आम्ही फटाके फोडणे बंद केले आहे. दिवाळीत विविध खेळ खेळतो. वृद्धांसोबत वेळ घालवतो. यंदा घरात, संकुलात सजावटीमध्ये प्लास्टिक, थर्माकोलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.   आशीष अशोक, रहिवासी, जोगेश्वरी पूर्व

या वर्षी गोरेगाव पूर्व भागातील काही तरुणांनी फटाके न फोडता, आपापल्या संकुलात, घरातील बाल्कनीत एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सोडला आहे. फटाक्यांवर पैसे खर्च करण्याऐवजी त्याच पैशांनी झाडे विकत घेणार आहोत.   कृतिका सोमण, रहिवासी, यशोधाम (गोरेगाव)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly diwali