निसर्ग आणि पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसला हद्दपार करण्यासाठी पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा नवा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. गाईचे शेण, शाडूची माती आणि अन्य पूरक गोष्टींपासून पर्यावरणस्नेही गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. पंचगव्यतज्ज्ञ व नाडीतज्ज्ञ डॉ. विनायक रानडे यांनी गोमय गणेशमूर्तीचा ‘श्रीगणेशा’ केला आहे.गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर भरमसाट प्रमाणात वाढला असून निसर्ग, समुद्र, विहिरी, नद्या आणि एकूणच पर्यावरणासाठी तो चिंतेचा विषय ठरला आहे. याला पर्याय म्हणून ‘गोमय गणेश’ करण्याची कल्पना डॉ. रानडे यांना सुचली. गेल्या वर्षी त्यांनी अत्यल्प प्रमाणात काही मूर्ती तयार केल्या होत्या. त्या मूर्तीत असलेल्या काही त्रुटी दूर करून आणि नव्याने प्रयोग करून, काही गोष्टींची भर टाकून यंदाच्या वर्षी डॉ. रानडे यांनी बेळगाव येथील कलाकार शिवाप्पा यांच्या मदतीने दोन हजार गोमय गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.या गोमय गणेशामुळे पाणी, शेती आणि निसर्गावर होणारे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतील तसेच गोवंशरक्षण आणि गोशाळा आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकेल. नागरिकांमध्येही पर्यावरण जतन आणि संवर्धनाबाबत हळूहळू जागृती होत आहे.
अंधेरी (पूर्व) येथील विमानगर (एलआयसी सोसायटी) सहकारी गृहनिर्माण संस्थेतील विजय बधेचा आणि अन्य काही पर्यावरणप्रेमी नागरिक यंदाच्या वर्षी त्यांच्या घरी गोमय गणेशाची प्रतिष्ठापना करणार असल्याचेही डॉ. रानडे यांनी सांगितले.

गोमय गणेशमूर्तीमधील मुख्य घटक हा गाईचे शेण, गोमूत्र व शाडूची माती हे आहेत. तसेच दूध, तूप, मुलतानी माती, गेरू, काजळी, नीळ, हळद, कुंकू यांचाही उपयोग करण्यात आला आहे. तयार करण्यात आलेल्या या मूर्ती साडेआठ ते नऊ इंचांच्या आणि २४० ग्रॅम वजनाच्या आहेत. या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर अवघ्या १ तास २० मिनिटांत गणपतीची मूर्ती पूर्ण विरघळून जाईल.
– डॉ. विनायक रानडे, मूर्तिकार

 

Story img Loader