मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नुकताच देशातील पहिला २०० मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरीयर (अडथळा) उभारण्यात आला आहे. वणी-वरोरा मार्गात हा प्रयोग करण्यात आला असून आता मुंबईत पहिली पूर्णत: बांबूचा वापर असलेली दोन मेट्रो स्थानके बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणस्नेही अशी बांबूची दोन मेट्रो स्थानके बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम सुरू असलेल्या कोणत्या मार्गिकेत आणि कोणती ही पहिली दोन मेट्रो स्थानके असतील हे लवकरच निश्चित केले जाणार आहे.एमएमआरडीएकडून सध्या काही मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहे.
मेट्रो प्रकल्पात पर्यावरणाला धक्का पोहचणार नाही यावर कायम भर दिला जात असल्याचा दावा केला जात आहे. आता याचअनुषंगाने एमएमआरडीएने आता पर्यावरणस्नेही मेट्रो स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने आता पहिले पर्यावरणस्नेही बांबूचे मेट्रो स्थानक उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. प्रायोगिक तत्त्वावर पहिले बांबूचा वापर असलेली दोन मेट्रो स्थानके असतील. प्रायोगिक तत्त्वावरील बांबूचे पहिले मेट्रो स्थानक कोणते असेल, बांधकाम सुरू असलेल्या कोणत्या मेट्रो मार्गिकेत हे स्थानक असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, लवकरच स्थानक निश्चित केले जाईल असेही श्रीनिवास यांनी सांगितले. मात्र मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले), मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) वा मेट्रो ५ (ठाणे- भिंवडी-कल्याण) मार्गिकेतील ही स्थानके असतील अशी शक्यता आहे. त्याचवेळी मेट्रो स्थानकाचे बांधकाम (सिव्हिल) वगळता स्थानकात पूर्णत: कडक अशा बांबूचा वापर केला जाणार असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.