मुंबई : पालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक आणि जैव विघटनशील सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना दर महिन्याला २० सॅनिटरी नॅपकीन देण्याची सूचना खासदार पीयूष गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे.

मासिक पाळीच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच कांदिवली (पश्चिम) येथील एम जी क्रॉस मार्गावरील मुंबई पब्लिक स्कुल येथे मासिक पाळीसंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मासिक पाळी आणि स्वच्छता या विषयावर विशेष चर्चा करण्यात आली. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवते. शालेय विद्यार्थिनींच्या अभ्यासात मासिक पाळीमुळे अडथळा निर्माण होऊ नये, तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी त्यांना वेळोवेळी सॅनिटरी नॅपकीन वितरीत केले जातात.

४९ लाख रुपयांची तरतूद

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यासाठी महापालिकेने २०२५ – २६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ४९ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यात प्राथमिकसाठी १९ लाख, तर माध्यमिकसाठी ३० लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. नेहमी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनच्या तुलनेत पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीनचा खर्च अधिक असल्यामुळे त्यासाठी सीएसआर निधी मिळवण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

सात हजार विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पीयूष गोयल यांनी महापालिका शाळेतील सात हजार विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले. तसेच, मासिक पाळीबाबत विद्यार्थिनींना मूलभूत स्वच्छता साधने उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला महापालिका अधिकारी, शिक्षक, आरोग्य तज्ञ आदी उपलब्ध होते. कार्यक्रमात मासिक पाळी संदर्भातील स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. गरजू विद्यार्थिनींना वेळोवेळी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध व्हावेत, यासाठी टप्प्याटप्प्याने हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

सीएसआर निधीसाठी प्रयत्न

पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीनचा खर्च सर्वसाधारण सॅनिटरी नॅपकीन्सपेक्षा अधिक आहे. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद असली तरीही यासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक नॅपकीन खरेदी करण्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्त्व निधीची (सीएसआर) मदत घेतली जाणार आहे.

पालिका शाळांमधील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या पारंपरिक सवयी, समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे त्यांच्या आरोग्यावर व शिक्षणावर विपरीत परिणाम होत असतो. सॅनिटरी नॅपकिनचा वापर खूपच कमी असल्याचे विविध सर्वेक्षणांतून निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या सर्वच शाळामध्ये नॅपकिन देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता.

Story img Loader