मुंबई : मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. खिचडी वाटपाच्या व्यवहारांबाबत संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे. राऊत यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणात यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची चौकशी झाली होती.
हेही वाचा >>> मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पेन्शन अदालतमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी; ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी
टाळेबंदीच्या काळात गरीब, मजुरांना खिचडी वाटप करण्यात आले होते. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. खिचडी गैरव्यवहारप्रकरणी १ सप्टेंबरला फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे , आदी कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्स मल्टी सर्व्हीसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधीत खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.