लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : टोरेस गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी आठ आरोपींविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. २७ हजार १४७ पानांच्या या आरोपपत्रात १४ हजार १५७ गुंतणुकदारांनी तक्रार केली असून त्यांची १४२ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील गुंतवणूकदारांना गंडा घालून परदेशात पलायन केल्याचे उघड झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने मे. प्लाटिनम हेर्न प्रा.लि., तानिया ऊर्फ टॅझगुल झॅस्टोव्हा, व्हेलेन्टिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तौसिफ रियाझ, अर्मेन अॅटीयन व लल्लन सिंह या आठ आरोपींविरोधात विशेष एमपीआयडी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून कंपनीशी संबंधित फर्निचर, विद्युत उपकरणे, सात ते आठ मोटरगाड्या यांचा लिलाव करण्याबाबत एमपीआयडी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.
टोरेसमधील आरोपींनी जयपूर येथील कंपनीतून मौल्यवान रत्ने खरेदी केली होती. त्या कंपनीने रत्ने परत घेऊन सुमारे दीड कोटी रुपये परत देण्याची तयारी दर्शविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यासाठीही पोलिसांनी परवानगी मागितली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. हा संपूर्ण कट युक्रेनचा नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. आरोपी असलेले युक्रेनमधील आठ नागरिक आणि तुर्कस्तानमधील एक नागरिक सध्या फरार आहे. मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे.
ईडीकडूनही तपास
याप्रकरणी ईडीही तपास करीत असून त्यांनी जयपूर व मुंबईत १३ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, मे. प्लाटीनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२० ते २५ नवीन शोरूम
आरोपी २०-२५ नवीन स्टोअर उघडण्याचा विचार करत होते आणि लवकरच भारतातून पलायन करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, कंपनीने कांदिवलीत नवीन स्टोअर उघडल्यानंतर लगेचच फसवणूक उघडकीस आली. सनदी लेखापाल अभिषेक गुप्ता यांनी अंतर्गत ऑडिट केले आणि व्यवस्थापनाला अहवाल सादर करून गंभीर आर्थिक अनियमितता दाखवून दिली, त्यामुळे हा गैरव्यवहार बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यावैद्याक लेखापरीक्षक
या प्रकरणी न्यावैद्याक लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. टोरेस कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करेल आणि पैशांचा प्रवाह शोधण्याचा प्रयत्न करेल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
- टोरेस प्रकरणातील नऊ परदेशी आरोपी पोलंड, दुबई व थायलंडमार्गे भारतातून पळाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
- या आरोपींनी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना पलायन केले. सध्या ते बल्गेरियामध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे.
- त्यांच्याविरोधात इंटरपोलची ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी झाली असून आता अजामीनपात्र वॉरंट मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावली जाईल.