मुंबई : टोरेस आर्थिक फसवणुक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने युक्रेन नागरिक आरमेन गरून अटाईन (४८) याला अटक केली. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईनने मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटाईन गेल्या १० वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला असून त्याने हिंदी चित्रपटामध्येही भूमिका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक तौसिफ रियाज उर्फ जाॅन कार्टर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पुण्यातून अटक केली. तौसिफच्या चौकशीत युक्रेन नागरिक अटाईनचा सहभाग पोलिसांना समजला. मग पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अटाईन याने काही सिनेमांमध्ये छोटे मोठे काम केले असून तो गोरेगाव येथील फिल्मसिटीत असतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिल्मसिटीत चौकशी केली. तेव्हा त्याचे खरे नाव व मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यवेळी अटाईन वर्सोवा येथे एक भाड्याच्या घरात राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एका निर्मिती कंपनीच्या माध्यमातून अटाईनला संपर्क साधला. त्याला काम करण्याबाबत विचारणा केली. अटाईन ते काम करालया तयार होताच त्याला बैठकीसाठी एके ठिकाणी बोलावण्यात आले. अटाईन तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तो १० वर्षांपासून मुंबईत राहत असून त्याचे आई-वडील युक्रेनचे नागरिक आहेत.
तो १० वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. तेव्हापासून तो येथेच वास्तव्याला आहे. त्याने काही हिंदी सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत. फसवणूक प्रकरणातील पसार आरोपी युक्रेन नागरिक मुंबईत आले तेव्हा त्यांना प्रस्थापित करण्याचे काम अटाईनने केले होते. शिवाय सनदी लेखापाल आणि तौसिफची ओळख देखील अटाईनने करून दिली होती. या मोबदल्यात काही रक्कमही मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. युक्रेनमधील आरोपींच्या पहिल्या दोन बैठकीला अटाईनही उपस्थित होता. शिवाय दादर येथील टोरेस कार्यालयाच्या उद्घाटनालाही अटाईन उपस्थित होता.
पोलिसांना अटाईनचा जन्म दाखला मिळाला असून आपला जन्म मुंबईत झाल्याचे तो सांगत आहे. त्यामुळे पोलीस पालिकेच्या संबंधित विभागाकडून अटाईनच्या जन्म दाखल्याची शाहनिशा करीत आहेत. दरम्यान, माझ्याकडे पारपत्र आणि व्हिसा नसल्याचा दावाही त्याने केला आहे. पोलीस त्याचाही तपास करीत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयही (ईडी) तपास करीत आहे.