मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि इतरांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडिरग) चौकशीसंदर्भात १०.२० कोटी रुपये मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. यात २ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपये किमतीची मुरुड, दापोली, रत्नागिरी येथील ४२ गुंठा जमीन, ७ कोटी ४६ लाख ४७ हजार रुपयांचे साई रिसॉर्ट एनएक्स याचा समावेश आहे.
पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला. पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परब यांनी त्यांचे व्यावसायिक मित्र सदानंद कदम यांच्या संगनमताने स्थानिक एसडीओ कार्यालयाकडून जमिनीचा वापर कृषी ते अकृषिक प्रयोजनात रूपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतल्याचे आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याचे पीएमएलएच्या तपासातून समोर आले आहे.
परब यांनी महसूल विभागाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र-तीन (सीआरझेड) अंतर्गत येणाऱ्या जमिनीच्या तुकडय़ावर तळमजला अधिक एक मजला बांधकाम करण्याची परवानगी नियम डावलून घेतली. परवानगी मिळाल्यानंतर तळमजला अधिक दोन मजले असलेल्या साई रिसॉर्ट एनएक्सचे बेकायदेशीरपणे बांधकाम केले. तसेच परब यांनी स्वत: मालक म्हणून ओळख लपवण्याच्या उद्देशाने विभास साठे या पूर्वीच्या मालकाच्या नावाने महसूल विभागाकडून परवानगी घेतली. यासंदर्भातील अर्जावर त्यांची खोटी स्वाक्षरी केली, असे ईडीकडून सांगण्यात आले.
परब यांनी ही जमीन सीआरझेड-तीनच्या अंतर्गत येत असल्याची वस्तुस्थिती ग्रामपंचायतीपुढे जाणूनबुजून लपवून ठेवली. मूळ विक्रीपत्रात कोणत्याही बांधकामाचा उल्लेख नसतानाही ही जमीन आपल्या नावावर इमारतीसह हस्तांतरित करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला. शिवाय, रिसॉर्टचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी कर आकारणीसाठी अर्ज देऊन परब यांनी ग्रामपंचायतीची फसवणूक केली आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले. रिसॉर्टच्या बांधकामाची देयके जाणीवपूर्वक रोखीने दिली गेली. परब यांच्या नावावर जमिनीची नोंदणी होण्यापूर्वीच बांधकाम सुरू करण्यात आले. तसेच, इमारतीच्या खऱ्या मालकाची ओळख लपवण्यासाठी आणि भविष्यात इमारत बांधकामासाठी केलेला खर्च आणि कोणतेही उल्लंघन समोर आल्यास त्याची जबाबदारी पूर्वीचे जमीनमालक विभास साठे यांच्यावर थोपवली जावी यासाठी असे करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. परब यांनी खरेदी केलेल्या भूखंडावर हे रिसॉर्ट बांधण्यात आले. मात्र, साई रिसॉर्ट एनएक्सच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी होत असल्याने आणि ना बांधकाम क्षेत्रातील रिसॉर्टच्या बांधकामातील त्रुटी समोर येत असल्याने परब यांनी ही जमीन व्यावसायिक सदानंद कदम यांना विकल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
न्यायालयात दाद मागणार दापोलीतील साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही. आपली बदनामी करण्यासाठी या प्रकरणात नाव जोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. संपत्तीचे आकडे फुगवून सांगायचे आणि बदनामी करायची हा यामागचा उद्देश आहे. ईडीच्या कारवाई प्रकरणी साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे योग्य ती पावले उचलतील, असे परब म्हणाले. किरीट सोमय्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आपण बांधील नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न केल्यास उत्तरे देईन, असेही परब यांनी सांगितले.