मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपन्यांचे प्रवर्तक आणि संचालक विजय आर. गुप्ता यांना नुकतीच अटक केली. ७६४ कोटींच्या बुडीत कर्जाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. याप्रकरणी ईडी सध्या कर्जातील रकमेतून खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेत आहे. त्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ते सध्या ईडी कोठडीत आहेत.
७६४ कोटी रुपयांचे बँकेचे नुकसान
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती. या प्रकरणात विंध्यवासिनी ग्रुपच्या सहा कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तक विजय आर. गुप्ता आणि अजय आर. गुप्ता यांच्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, या कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) बनावट आणि फसव्या कागदपत्रांच्या आधारे विविध कर्ज घेतली. मात्र, २०१३ मध्ये सर्व कर्ज खाती बुडीत घोषित करण्यात आली. त्यामुळे बँकेला ७६४ कोटी ४४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बुधवारी ईडीने गुप्ता यांना अटक केली.
कर्जाचा गैरवापर व बनावट कागदपत्रे
ईडीच्या तपासानुसार विजय आर. गुप्ता यांनी स्टील रोलिंग मिल्स (सिल्वासा आणि महाराष्ट्र) खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या नावाने टर्म लोन आणि कॅश क्रेडिट सुविधा घेतल्या होत्या. तसेच, राजपूत रिटेल लिमिटेड या कंपनीच्या नावाने मॉल बांधणी आणि व्यावसायिक इमारतीच्या खरेदीसाठी कर्ज घेतले. कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बनावट व फुगवलेले करार दाखवण्यात आले. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
चाळीसहून अधिक बनावट कंपन्यांचा वापर
कर्जातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तपासानुसार चाळीसहून अधिक बनावट कंपन्या तयार करून कर्जाच्या रकमेची अफरातफर करण्यात आली. त्यातील काही रक्कम मुंबई आणि परिसरातील मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आली असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या मोठ्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून अधिक तपास सुरू असून मालमत्तांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयचा तपास पूर्ण झाला असून त्यांनी याप्रकरणात आवश्यक सर्व पुरावे सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी गुप्ता यांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले. पण न्यायालयाने गुरूवारी याप्रकरणात गुप्ता यांना सात दिवसांची कोठडी सुनावली.