मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३३३ कोटी ८२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेत मेसर्स कुटे सन्स डेअरी लिमिटेडची आणि मेसर्स कुटे सन्स फ्रेश डेअरी प्रायव्हेट लिमिटेडची सातारा व अहमदनगर येथील जमीन, इमारती, प्रकल्प आणि मशीन यांचा समावेश असल्याची माहिती गुरुवारी ईडीकडून देण्यात आली.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. त्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबा कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणून त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यात चार लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती.
हे ही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
तपासानुसार, या प्रकरणी २,४६७ कोटी ८९ लाख रुपये इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १४३३ कोटी ३० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.