माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या वरळीतील सीजे हाऊस येथील मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) गेल्यावर्षी टाच आणली होती. त्या कारवाईला ईडीच्या न्यायिक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ईडी लवकरच याप्रकरणी पुढील कारवाई करणार आहे.
पटेल व कुटुंबियांच्या मालकीच्या वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर ईडीने गेल्यावर्षी जुलै महिन्यात तात्पुर्ती टाच आणली. अशा कारवाईनंतर ईडीचे न्यायिक प्राधिकरण संबंधीत कारवाईची पडताळणी करते व त्या कारवाईबाबत सहा महिन्यात अहवाल दिला जातो. पटेल यांच्या प्रकरणातही ईडीच्या न्यायिक प्राधिकरणाने पडताळणी करून टाच योग्य असल्याची मान्यता दिली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत ठरावीक वेळी घंटा वाजवावी
टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेचा व्यवहार गुंड दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी करण्यात आल्याचा आरोप आहे. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या पत्नीशी २०१९ मध्ये करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याच्या कुटुंबियांशी वरळीतील या जागेसंदर्भात व्यवहार करण्यात आला होता. ही जागा वरळीमधील नेहरू तारांगणच्या जवळ आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली होती. एका पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी आपले कुटुंब तसेच ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारावर २०१९ मध्ये स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा >>> पावसाळ्यापूर्वी गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याचा निर्धार; रेल्वे आणि महानगरपालिकेच्या बैठकीत जलदगतीने काम करण्यावर भर
हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता, असे प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. जमिनीचा इतिहास सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल याला विकण्यात आली असल्याचे सांगितले होते. २००४ मध्ये इक्बाल मेमनबरोबर जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इक्बाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,” असे पटेल म्हणाले होते. संबंधित जागा पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इक्बाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती, असा ईडीचा दावा आहे. ईडीने यापूर्वी इक्बाल मिर्ची कुटुंबियांच्या मालकीच्या दोन मजल्यावरही टाच आणली होती.