मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) टाच आणली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.ईडी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी तपास करत आहे. गैरव्यवहारातील रक्कम ६७ बोगस खात्यांच्या माध्यमातूनव्यवहारात आणल्याचा संशय आहे.
हेही वाचा >>> निर्भया निधीतून पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या कर्ज खात्यांवर गैरव्यवहाराताली रक्कम जमा झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही संस्थांवर पाटील यांचे वर्चस्व होते. या प्रकरणी १५ जून २०२१ रोजी पाटील यांना ईडीने अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वीही ईडीने त्यांच्या साधारण २३४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. हा संपूर्ण घोटाळा ५६० कोटी रुपयांचा आहे. कर्नाळा बँकेतील कोट्यावधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे ठेवीदारांनी आंदोनही केले होते. या बँकेत ५० हजार ६८९ ठेवीदार आहेत. याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे ईडीने याप्रकरणी झालेल्या संशयीत आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला होता.