मुंबई : मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून सुमारे १२०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात ईडीला यश आले आहे. हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय आहे. बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद फंडिंगशी संबंधित ही रक्कम असल्याचा संशय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमन याने नाशिकमधील दोन बँकांमध्ये सुमारे १४ खाती उघडली होती. त्यातील गैरव्यवहाराप्रकरणी मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले होते. तसेच या बेहिशोबी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला होते. पण हे प्रकरण टेरर फंडिंगशी संबंधित असल्याचा संशय आहे.

हेही वाचा…लोअर परळमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई, गणपतराव कदम मार्गावरील अतिक्रमण हटवले

आरोपी सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. त्यात नागरिकांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. या संपूर्ण गैरव्यवहारचा मुख्य सूत्रधार मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असून त्याच्या संपर्कात असलेल्या शफीमिय़ा आमीरमिया शेख व मोहसन अहमद मुस्ताक अली खिलजी या दोघांना २ जानेवारीला ईडीने अटक केली. आरोपी मुख्य आरोप मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून ते दुबईला पळण्याचा प्रयत्न करत होते. ईडीने त्यांच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी केल्यामुळे त्यांना अहमदाबाद विमानतळावर थांबवण्यात आले. त्यापूर्वीही ईडीने ६ डिसेंबरला भागडचे दोन साथीदार नागाणी अक्रम मोहम्मद शफी व वासिम वलीमोहम्मद भेसानिया यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी बनावट खात्यामधून मोठ्या प्रमाणत रक्कम काढण्याचे समजते. तसेच मुंबई, अहमदाबाद व सूरतमधील हवाला व्यावसायिकांनीही या खात्यातील रक्कम काढल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी ईडीने मुंबई व अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे टाकले होते. त्यात मुंबईतील अंगडिया व्यवसायिकाशी संबंधित एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईत १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed filed charge sheet against malegaon businessman for misappropriating 1200 crores mumbai print news sud 02