मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच उच्च न्यायालयात सांगितले. विशेष म्हणजे, भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्याविरोधातील याचिका मात्र ईडीने मागे घेतलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीने २०१६ मध्ये अटक केली होती. त्यानंतर, दोन वर्षांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता. दुसरीकडे, विशेष न्यायालयानेही १६ ऑक्टोबर रोजी भुजबळ यांना पारपत्र नूतनीकरणाची परवानगी देऊन परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला ईडीने २०१८ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हेही वाचा… सरोगसीसाठी सरकार देणार आर्थिक मदत? महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार

हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आले. त्यावेळी याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयानेही ईडीच्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच, याचिका नेमकी कशासाठी केली हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने ईडीला वेळ दिला होता.

न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठापुढे या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येत असल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, ही याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयानेही ईडीची मागणी मान्य केली.