विविध कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक उलाढालप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांना प्रश्नावली पाठविली आहे. तसेच स्वत: किंवा प्रतिनिधीमार्फत आठ दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र याबाबत आणखी दोन आठवडय़ांचा कालावधी मागण्यात आला आहे, असे समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले. पंकज यांना प्रश्नावली पाठविण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र सदन आणि इतर प्रकरणांत छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज व समीर यांच्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने कंत्राटदाराच्या सुमारे १८ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आता पंकज व समीर यांना समन्स पाठविले आहे. समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीतून सिंगापूरमधील आर्मस्ट्राँग ग्लोबर आणि आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आलेल्या ३० कोटी रुपयांबाबत तसेच या दोन्ही कंपनींतून आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीत पुन्हा आठ कोटी रुपये वळविल्याबाबत प्रामुख्याने विचारणा करण्यात आली आहे, असे कळते. याप्रकरणी सारस्वत बँकेच्या अधिकाऱ्यांचे जबाबही सक्तवसुली संचालनालयाने नोंदविले आहेत. याशिवाय महाराष्ट्र सदन आणि हेक्स वर्ल्ड प्रकल्पाबाबतही विचारणा करण्यात आली आहे, असे कळते.
याबाबत समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाने प्रश्नावली पाठविणे हे साहजिकच आहे. आमचा कुठल्याही हवाला व्यवहाराशी काडीचाही संबंध नाही. जे आर्थिक व्यवहार झाले आहेत ते धनादेशाद्वारे झाले आहेत. त्याचा संपूर्ण तपशील विविध बँक खात्यांतून उपलब्ध आहे. महाराष्ट्र सदन आणि हेक्स वर्ल्ड प्रकल्पाचा परस्पर काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्र सदन प्रकरणातून हेक्स वर्ल्डसाठी आर्थिक पुरवठा केला गेला, हे धादांत चुकीचे आहे.
हेक्स वर्ल्ड प्रकल्प हा माझा वैयक्तिक प्रकल्प आहे. सिडकोने रस्ता मंजूर न केल्यामुळे सध्या हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकरणी जो गुन्हा दाखल झाला आहे तो भ्रष्टाचाराबाबत नव्हे तर गुंतवणूकदारांना त्यांच्या सदनिकांचा ताबा मिळाला नसल्याबाबत आहे. या प्रकल्पाशेजारी ज्यांचा प्रकल्प आहे, त्यांना माझ्या प्रकल्पावर टाच यावी, असे वाटत आहे. त्यामुळे आम्हाला बदनाम केले जात आहे, असा दावाही समीर भुजबळ यांनी केला. किंबहुना हा प्रकल्प लवकर पूर्ण करून संबधितांना मला ताबा द्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा