महाराष्ट्र सदन आणि अन्य गैरव्यवहारांप्रकरणी सध्या अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केलेले भुजबळांचे सनदी लेखापाल (सीए) सुनील नाईक यांनी गुरूवारी न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे भुजबळांच्या गैरव्यवहारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे. ईडीने आज सकाळी सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि सुनील नाईक यांच्यासह आणखी ३४ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. नाईक हे भुजबळांच्या वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते. याशिवाय, समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या हवालामार्फत अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानण्यात येतो. त्यामुळेच ईडीने भुजबळांभोवतीचे फास आवळण्यासाठी नाईकांना गळाला लावल्याची चर्चा आहे. माफीचा साक्षीदार बनवण्याच्या अटीवरच सुनिल नाईक यांनी इडीला सर्व माहिती पुरवल्याची माहिती इडी सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सुनिल नाईक यांची औपचारिक अटक दाखवून पुढे जामिन देण्याच्या अटींवर अटक करण्यात आल्याची माहिती इडी सुत्रांनी दिली आहे.
छगन भुजबळांचा पाय आणखी खोलात; सीए सुनील नाईक होणार माफीचा साक्षीदार
ईडीने आज सकाळी सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 05-05-2016 at 19:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed produced chhagan bhujbal aide sunil naik as approver in court