राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून यावेळी वादळी चर्चा पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचं पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ठाकरे सरकारमधील आणखी एका नेत्याची चौकशी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने मंगळवारी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत.

काय आहे प्रकरण –

मार्च महिन्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी पदाचा गैरवापर करत २०१४ मध्ये अलिबागमध्ये जमिनींची खरेदी केली आणि नंतर त्या आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे हस्तांतररित केल्या असा आरोप केला होता. तसंच रवींद्र वायकर यांनी आपल्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली नसल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.

उद्धव ठाकरेंकडून जमीन खरेदी प्रकरणात पदाचा गैरवापर; सोमय्या यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी ३ मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे.

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट

अलिबागमधील कोर्लाई येथील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला होता. तसंच मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा सोमय्यांचा दावा आहे.

किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

दरम्यान एप्रिल महिन्यात रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि १०० कोंटीचा मानहानीचा दावा ठोकला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप करत वायकर दांपत्याने १०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली. तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली होती.