मुंबई : टी-२० विश्वचषक सामन्यांचे बेकायदा प्रक्षेपण आणि ऑनलाईन सट्टेबाजीप्रकरणी सक्तवसुली संचलनलायाने (ईडी) मुंबई, पुणे व दिल्ली येथील २१ ठिकाणी छापे टाकले. मॅजिकविन प्रकरणी सुरू असलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत बँक खात्यांमधील ३० लाख रुपये गोठवण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. चित्रपट कलाकारांनी या सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहितात केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील अहमदाबाद येथील सायबर पोलीस ठाण्यात मॅजिकविन व इतरांविरोधात दाखल गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याबाबत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मॅजिकविन हे सट्टेबाजीचे एक संकेतस्थळ असून ते गेमिंगच्या नावाखाली चालवले जाते. ते संकेतस्थळ पाकिस्तानी नागरिकाच्या मालकीचे आहे. हे संकेतस्थळ दुबईत काम करणारे किंवा स्थायिक झालेले भारतीय नागरिक चालवत आहेत. फिलिपिन्समध्ये सट्टेबाजी कायदेशीर आहे. त्यामुळे या संकेतस्थळावर दाखवले जाणारे सट्टेबाजीचे खेळ फिलिपिन्समधून चालवले जात आहेत. त्याच्या आडून या संकेतस्थळावरून खेळांचे बेकायदा प्रक्षेपणही केले जाते. या संकेतस्थळावरील सट्टेबाजी, संबंधित रक्कम, बेटिंग लावणे आणि पैसे काढण्याचे नियंत्रण मात्र मॅजिकवीनच्या मालकांकडे असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा…“… आणि मला पँटमध्येच लघवी करावी लागली”, ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टमध्ये सुविधांची वानवा; प्रेक्षकानं सांगितला धक्कादायक अनुभव

खेळाडू किंवा बेटिंग करणाऱ्यांनी संकेतस्थळावर दाखवलेल्या बँक खात्यात जमा केलेले पैसे विविध बनावट बँक खात्यांद्वारे वळवण्यात आले. त्यातून नफा झालेली रक्कम (कूट चलनात) क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवण्यासाठी, रोख स्वरूपात काढण्यात अथवा हवाला मार्गाने दुबईला पाठवण्यात आली. तसेच, खेळाडू किंवा बेटिंग करणाऱ्यांना जिंकलेली रक्कम त्याच्या बँक खात्यात बनावट कंपन्यांच्या खात्यांमार्फत आणि पेमेंट गेटवेच्या मदतीने हस्तांतरित केली जाते. काही रक्कम डोमेस्टिक मनी ट्रान्सफरच्या (डीएमटी) माध्यमातूनही जिंकलेल्यांच्या खात्यांमध्ये पाठवली जाते.

मॅजिकविनने भारतात एका भव्य लॉन्च पार्टीचे आयोजन केले होते. तेथे अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मॅजिकविनची जाहिरात केली. या कालाकारांची संकेतस्थळासाठी छायाचित्रे काढण्यात आली. तसेच जाहिरातीचे चित्रीकरणही करण्यात आले. या कलाकारांनी छायाचित्र व चित्रफीती आपल्या समाज माध्यमांंवर पोस्ट केले. विविध भागांमध्ये जाहिरात फलकही लावण्यात आले होते. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रातात असे फलक लावण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सट्टेबाजी संकेतस्थळाद्वारे जमा झालेल्या एकूण ठेवींतील ५० टक्क्यांहून अधिक रक्कम नफा स्वरूपात मिळत आहे.

हेही वाचा…चाकूचा धाक दाखवून पादचाऱ्यांची लूटमार

ईडीने याप्रकरणी आतापर्यंत ६८ ठिकाणी छापे टाकले आणि महत्त्वाची कागदपत्रे, तसेच डिजिटल उपकरणे जप्त केली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण तीन कोटी ५५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.ईडीने १० आणि १२ डिसेंबर रोजी ही कारवाई केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raided 21 locations in mumbai pune and delhi over illegal t20 world cup broadcasts and betting mumbai print new sud 02