मुंबई : व्हीआयपीस् ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या गुंतवणूक गैरव्यवहाराप्रकणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कोल्हापूर, नाशिक व पुणे येथे शुक्रवारी छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, बँक निधी, मुदत ठेवी, दागिने अशी एकूण पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त अथवा गोठवण्यात आली.
याशिवाय संशयीत कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.सामान्य नागरिकांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
हेही वाचा – १० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
चांगला परतावा देण्याच्या नावाखाली गुंतवणूक योजना व ट्रेडिंगमध्ये आमिष दाखवून आरोपींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून विविध बँक खात्यात गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून अधिक जमा केली. याप्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत वास्तव्याला असलेला विनोद खुटे हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सेवा, फॉरेक्स ट्रेडिंच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. विनोद खुटेने मेसर्स व्हीआयपीस् व्हॉलेट प्रा.लि.सह व्हीआयपीस् ट्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स काना कॅपिटल्स लिमिटेड, मेसर्स ग्लोबल एफिलिएट बिझनेस, व्हीआयपीस् सिक्युरिटीज आणि व्हीआयपीस् प्रॉपर्टीज अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकदारांकडून रक्कम गोळा केली. ती रक्कम बनावट कंपनी व खात्यांच्या माध्यमतून व्यवहारात आणण्यात आली. त्यानंतर हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईत पाठवण्यात आले. हे व्यवहार तपास यंत्रणाच्या नजरेत येऊ नये यासाठी यूएसडीटी सारख्या कूट चलनाचा वापर करण्यात आला.
आतापर्यंत विनोद खुटेने केलेल्या खर्चाचा तपशील ईडीने तपासला असता गुन्ह्यातील रक्कम १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे निदर्शनास आले. या रकमेतून दुबई व भारतात मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत, असा आरोप आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७० कोटी ८६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.