महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसाविरोधी दाखल केलेल्या गुन्ह्य़ात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ तसेच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर सोमवारी छापे टाकले. छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत गेलेले असल्यामुळे ते या वेळी उपलब्ध नव्हते, असे सांगण्यात आले. दरम्यान चौकशीसाठी समीर यांना सोमवारी रात्री सक्तवसुली संचालनालयात नेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांचे वकील सेजल यादव यांनी सांगितले.
भुजबळ यांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) येथील कार्यालयांसह पंकज व समीर संचालक असलेल्या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. याप्रकरणी सविस्तर तपशील देण्यास सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. तब्बल २० अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळपासून नऊ ठिकाणी छापे टाकले.
या वेळी उपस्थित असलेल्या समीरचा जबाबही या अधिकाऱ्यांनी नोंदविला. आवश्यकता भासल्यास समीरला पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स व इतर प्रकरणांतून मिळालेल्या लाचेची रक्कम पंकज व समीर यांनी विविध कंपन्यांमध्ये गुंतविली. यामध्ये खारघर येथील गृहप्रकल्पाचाही समावेश आहे तसेच इंडोनेशिया येथेही काही रक्कम वळविण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पंकज व समीर या दोघांवर चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत वेळ मागितला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी या चौकशीचा अहवाल येत्या चार आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश सक्तवसुली महासंचालनालयाला दिले होते. तसेच या कंपन्यांचे संचालक सहकार्य करीत नसल्याची बाबही न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सक्तवसुली महासंचालनालयाने छापे टाकून समीरचा जबाब नोंदविला. पंकजलाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. महासंचालनालयाने समीर भुजबळ यांच्या खारघर येथील गृहप्रकल्पाचा भूखंड तसेच वांद्रे येथील पुनर्विकासासाठी घेतलेली इमारत आणि भुजबळ कुटुंबीयांचे वास्तव्य असलेल्या ला पेटीट या इमारतीवर याआधीच जप्ती आणली आहे. सोमवारी टाकण्यात आलेले छापे ही यापुढील कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर व पंकज भुजबळ चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे सक्तवसुली महासंचालनालयाने वेळ पडल्यास या दोघांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा