सरकारी बँकांचे कर्ज फेडण्याच्या माझ्या प्रयत्नात ईडीने अडथळे आणले असा दावा फरार आरोपी विजय मल्ल्याने केला आहे. भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवून देशाबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याने आज वकिलामार्फत त्याची बाजू मुंबईतील विशेष कोर्टापुढे मांडली.

अंमलबजावणी संचलनालयाने विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार घोषित करावे अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर त्याने उत्तर दिले. मागच्या दोन ते तीन वर्षात मी सरकारी बँकांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. कर्ज फेडीची ही प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी ईडीने प्रत्येक पायरीवर आपल्या मार्गात अडथळे निर्माण केले असा आरोप मल्ल्याने केला आहे. फरार म्हणून घोषित करण्याच्या ईडीच्या याचिकेवर मल्ल्याने आक्षेप घेतला आहे.

हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण ब्रिटनमधल्या यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करत आहोत असे त्याने कोर्टाला सांगितले. मल्ल्याच्या हस्तांतरणा संबंधीची ब्रिटनमधली सुनावणी समाप्त झाली असून यासंबंधी १० डिसेंबरला निकाल सुनावण्यात येणार आहे. हस्तांतरणाच्या याचिकेवर निकाल येईपर्यंत सध्या सुरु असलेली सुनावणी स्थगित करण्याची मागणी त्याने याचिकेत केली आहे.

विजय मल्ल्याने एसबीआयसहित प्रमुख बँकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पोबारा केला आहे असा त्याच्यावर आरोप आहे. ही रक्कम ९ हजार कोटींच्या घरात आहे. सध्या विजय मल्ल्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यार्पणासंदर्भातला खटला लंडन येथे सुरु आहे. विजय मल्ल्यावर हा खटला भारताच्या बाजूने सीबीआय आणि इडीनेच दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच विजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटलींची भेट घेतली होती असे म्हटले होते. ज्यानंतर काँग्रेसने अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. विजय मल्ल्याने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे एकच खळबळ उडाली होती. विजय मल्ल्या खोटं बोलत असल्याचे अरूण जेटली यांनी म्हटले होते. तर विजय मल्ल्या हा देश सोडून पळाला ते अरूण जेटलींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसने केली होती.

Story img Loader