मुंबई: बँक समुहाची १,४३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यात जमीन आणि इमारत स्वरूपातील स्थावर आणि जंगम संपत्ती, तसेच बँक खात्यांत ठेवलेल्या निश्चित ठेवींचा समावेश आहे. उशदेव इंटरनॅशनल लिमिटेड (यूआयएल) आणि इतरांद्वारे केलेल्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून गुरूवारी देण्यात आली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०२२ मध्ये संचालक (जामीनदार) सुमन गुप्ता व प्रतिक गुप्ता, उशदेव इंटरनॅशनल लि. व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धातू व्यवसायातील कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तक संचालकांनी एसबीआय व व इतर समुह सदस्य बँकाचे (सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ) नुकसान केल्याचा आरोप आहे. आरोपींनी निधी इतरत्र वळवला, तसेच परदेशी संस्थांसोबत विक्री दाखवून, खात्यांच्या पुस्तकांमध्ये फेरफार करून बँकांच्या निधीचा गैरवापर केला. तसेच संस्थांनी गेल्या ५ ते ९ वर्षांत व्यवसाय केला नाही आणि संबंधितांना कर्ज व अग्रीम रक्कम दिली. तसेच अटी-शर्तींचे उल्लंघन करून बँकाचे सुमारे १,४३८ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान केले, असे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणाच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
ईडीच्या तपासानुसार मे. यूआयएला अनेक बँकांनी दिलेली कर्जाची रक्कम वेगवेगळ्या संस्थांकडे आगाऊ पैसे आणि असुरक्षित कर्जांच्या स्वरूपात वळवण्यात आली. नंतर अनेक बँक खात्यांमधून पैसे वळवून, तो निधी अखेरीस भारतातील कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यात मे. यूआयएलच्या परदेशी उपकंपन्या मुख्य भागीदार आहेत. या उपकंपन्या यूआयएलच्या संचालक आणि मुख्य भागधारकांद्वारे नियंत्रित आणि व्यवस्थापित केल्या जात होत्या. तसेच, मे. यूआयएलला अनेक बँकांकडून क्रेडिट सुविधा दिल्या गेल्या आणि यापैकी बहुतांश निधी यूआयएलकडून परदेशातील अनेक संस्थांकडे वळविण्यात आला. त्या संचालक, प्रवर्तक किंवा भागिदारांनी स्थापन केल्या होत्या.
हे ही वाचा…मुंबई : संस्कृती, परंपरा जपणारी केशवजी नाईकांची चाळ
त्यानंतर ईडीने तपासात यूआयएलचे संचालक आणि भागीदार आणि त्यांच्या समूह कंपन्यांच्या भारतात असलेल्या ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेची माहिती मिळवली. त्यावर पीएमएलए कायदा २००२ कलम ५ अंतर्गत तात्पुरती टाच आणण्यात आली आहे. यापूर्वी, फेब्रुवारी २०२३ मध्ये याप्रकरणी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली होती. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.