मुंबई : टोरेस गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुल संचलनालयाने (ईडी) मोठ्या प्रमाणात संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, मे. प्लाटीनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीने याप्रकरणी मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी गुरुवारी छापे टाकले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील १० व जयपूर येथील तीन ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. ईडीने याप्रकरणी प्लाटिनम हेर्न प्रा.लि. व त्याच्या सहयोगी संस्थांच्या अनेक बँक खात्यांची तपासणी केली. यामध्ये संशयास्पद व्यवहार आणि इतर संस्थांशी असलेल्या संबंधांचा उलगडा झाला. या संस्थांना करण्यात आलेल्या देयकांची सध्या चौकशी सुरू आहे. बँक खात्यांच्या तपासादरम्यान, प्लाटिनम हेर्न प्रा. लि.च्या खात्यात विविध बनावट संस्थांकडून १३ कोटी ७८ लाख रुपये रक्कम प्राप्त झाली होती. या संस्था लल्लन सिंह नावाच्या यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ही रक्कम मुंबईत टोरेस ज्वेलरीच्या कामकाजासाठी वापरण्यात आली होती.

हेही वाचा…मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

ईडीने याप्रकरणी मुंबई आणि जयपूरमधील विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये प्लाटिनम हेर्ने प्रा. लि च्या संचालक सर्वेश सुर्वे यांच्या उमरखाडी, मुंबई येथील निवासस्थानी, तसेच मे. जेमेथीस्ट (किशनपोल बाजार, जयपूर), मे. स्टेलर ट्रेडिंग कंपनी (जौहरी बाजार, जयपूर आणि काळबादेवी, मुंबई) या सहयोगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच, प्रमुख सहयोगी लल्लन सिंग यांचे मुलुंड, मुंबई येथील निवासस्थान आणि संशयित हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद्र खारा यांच्या मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील निवासस्थानीही तपासणी करण्यात आली. यावेळी फसवणूक योजनांशी संबंधित अधिक पुरावे उघडकीस आले.

याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करीत आहे. ईडीने गुरूवारी सकाळपासूनच मुंबईतील १० ठिकाणी शोध मोहीम राबवली. याशिवाय राजस्थानमधील जयपूर येथील ३ ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. टोरेस प्रकरणातील दागिन्यांची निर्मिती जयपूर येथे केली जात होती. त्यामुळे तेथे छापे टाकण्यात आले. याशिवाय मुंबईतील टोरेससंबंधी ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला.

हेही वाचा…ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार

या गैरव्यवहारात सव्वालाख गुंतवणूकदारांचे एक हजार कोटी रुपये असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यात आठ जण युक्रेनमधील व एक तुर्कस्थानमधील नागरिक आहे. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed seized large number of suspicious documents digital evidence in torres scam case mumbai print news sud 02