महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी गुरूवारी सकाळी समीर यांना अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात आणण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर आता समीर भुजबळ यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले आहे. तर छगन भुजबळ यांना थोड्याचवेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे.
छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नव्हते. सर्व प्रश्नांना मला माहिती नाही, असे उत्तर दिल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. याशिवाय, समीर भुजबळ यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही मला त्यांच्या व्यवहारांबद्दल कोणती माहिती नसल्याचे भुजबळांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाची परवानगी घेऊन आज त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
छगन भुजबळ यांच्या कोठडीची मुदत संपत असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडी भुजबळ यांच्या अधिकच्या तपासासाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काल छगन भुजबळांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर जेजे रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी ईडीच्या कार्यालयात त्यांची तपासणी केली. भुजबळांचा जुना ईसीजी आणि नुकताच काढलेल्या ईसीजीमध्ये बदल असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, आज भुजबळ यांना जे जे रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.

Story img Loader