राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी ED नं शुक्रवारी छापे टाकले. दिवसभर या छाप्यांमधून चौकशीचं काम झाल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुखांनी पत्रकारांशी बोलताना ईडीला पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला. त्यापाठोपाठ आज सकाळी ईडीनं त्यांचे स्वीय सहय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना अटक केली. आणि आता खुद्द अनिल देशमुख यांनाच ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना शुक्रवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आता अनिल देशमुख यांच्या चौकशीवर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या ‘लेटरबॉम्ब’मुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. “मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. या पत्रानंतर झालेल्या गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनिल देशमुख हे संशयाच्या घेऱ्यात असून आधी सीबीआय आणि नंतर ईडीनं त्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

परमबीर सिंह यांच्या पत्रात काय आहेत आरोप?

“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांच्या पत्रात नेमकं काय? वाचा सविस्तर

 

इतर मंत्र्यांना देखील माहिती होतं?

“अँटिलिया प्रकरणाविषयी मार्च महिन्यात जेव्हा मला रात्री उशिरा वर्षावर बोलवण्यात आलं, तेव्हा गृहमंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींबाबत मी सांगितलं होतं. याच गोष्टींबाबत मी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर वरीष्ठ मंत्र्यांना देखील माहिती दिली होती. मी माहिती दिली, तेव्हा मला जाणवलं की काही मंत्र्यांना याबद्दल आधीच माहिती होतं”, असा गंभीर दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

Story img Loader