मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना करोना जम्बो केंद्र कथित गैरव्यवहारप्रकणी समन्स बजावले असून त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे. १९९६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. करोना जम्बो केंद्र कथित घोटाळा झाला त्यावेळी जयस्वाल महापालिकेमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावर होते. जयस्वाल यांना गुरुवारी ईडीच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
हेही वाचा… ‘मातोश्री’वरील सुरक्षेत कपात; शिवसेना नेत्यांचा दावा, पोलिसांकडून इन्कार
जयस्वाल हे मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ पदावरील अधिकारी होते. जयस्वाल यांनी करोना केंद्रासंबंधी आरोग्य सेवा, कर्मचारी आणि उपकरणांचा पुरवठा याबाबतच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी केल्यामुळे त्याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांना ईडीने बोलवले आहे. याप्रकरणी बुधवारी ईडीने १५ ठिकाणी छापे टाकले होते. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित कंपन्यांना कंत्राट देताना कोणते निकष पाळले गेले, याबाबत ईडी तपास करीत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ही चौकशी सुरू आहे. सोमय्यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, फौजदार विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीनुसार, याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफलाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ऑक्टोबर, २०२२ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारीमध्ये महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नोटीस बजावून लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसबरोबर केलेला करार आणि खर्चाला दिलेल्या मंजुरीबाबतची माहिती मागवली होती.