कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने चार्जशीटमध्ये चौकशीसाठी नवाब मलिक यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांना समन्स बजावूनही हजर राहिले नसल्याची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणीच ईडीने हे समन्स बजावलं होतं.
ईडीने चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोन वेळा तर मुलगा फराज मलिकला पाच वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्यांच्यापैकी एकही जण चौकशीसाठी हजर राहिलं नाही”.
ईडीने मंगळवारी विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल केली असून नवाब मलिकांचे फरार गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीसोबत दीर्घ काळापासून संबंध असल्याचं तपासात सिद्ध झाल्याचं सांगितलं आहे.
नवाब मलिक अटकेत का आहेत?
नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणी २३ फेब्रुवारीला अटक केली. दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळलं होतं. त्यानुसार ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली होती.
मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडी कार्याललायत नेण्यात आलं होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली होती.
मलिकांवर आरोप काय?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आहे.
मालमत्तांवर टाच
नवाब मलिक यांच्याशी संबंधित आठ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रे व उस्मानाबाद येथील मालमत्तांचा समावेश आहे.
कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक मालमत्ता, तीन सदनिका, उस्मानाबाद येथील १४७ एकर जमीन, वांद्रे पश्चिम येथील दोन सदनिका या मालमत्तांवर ‘ईडी’ने कारवाई केली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, मे. सॉलिड्स इन्वेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावावर आहेत. याशिवाय मे. सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामार्फत या मालमत्तांवर गोळा करण्यात आलेले ११ कोटी ७० लाख रुपयांचे भाडेही गुन्ह्यांतील उत्पन्न असल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आलं आहे.