लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ‘फेअर प्ले’ बेटिंग ॲप प्रकरणात २१९ कोटी ६६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यात राजस्थान,गुजरात, दमण, ठाणे व मुंबईतील डीमॅट खाते, जमीन, सदनिका व व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे. ‘फेअरप्ले ॲप’द्वारे आयपीएल प्रसारणसह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती. त्याप्रकरणी छाप्यांदरम्यान या मालमत्तेची माहिती मिळली होती.

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी ‘फेअर प्ले’ ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार ‘वायकॉम १८ नेटवर्क’ कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण ‘फेअर प्ले’ नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.

आणखी वाचा-निवडणूक रणधुमाळी संपताच शेतकऱ्यांना पहिला दणका; जाणून घ्या, गायीच्या दूध खरेदी दरातील नेमका बदल

‘वायकॉम १८’ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण ‘फेअर प्ले’ या ॲपवर सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार ‘वायकॉम १८’ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने ‘फेअर प्ले’ ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणाच्या आधारावर ईडीनेही तपासाला सुरूवात केली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही ‘फेअर प्ले’ने सट्टेबाजी केली होती, असे तपासात निष्पन्न झाले.

‘फेअर प्ले’ने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संस्थांसोबत करार केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच भारतीय संस्था, कंपन्यांनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही.

आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – बीकेसी मार्गिकेवर तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच

‘फेअर प्ले’ने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेचा वापर करून ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करण्यात आले. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ईडीने २२ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील अजमेर, गुजरातमधील कच्छ, दमण, ठाणे व मुंबईतील २१९ कोटी ६६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली. याप्रकरणी आतापर्यंत चार वेळी ईडीने शोध मोहीम राबवून ३३१ कोटी १६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed takes major action against fairplay app for online betting on elections mumbai print news mrj