लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकतेच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुरेश कुटे व इतर २४ आरोपींविरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी ईडी तपास करत आहे. याप्रकरणी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते.

‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’च्या विविध जिल्ह्यांत ५२ हून अधिक शाखा आहेत. त्यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणत त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि ‘एफडीआर’ कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यामध्ये चार लाख गुंतवणूकदारांची सुमारे २,४६७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने या प्रकरणात गेल्यावर्षी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले होते.

कुटेविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा कायद्याच्या (एमपीआयडी) कलमांखाली नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. २४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याप्रकरणी ६ मार्चला ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने मंगळवारी या आरोपपत्राची दखल घेतल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.

१,४३३ कोटी ४८ लाखांच्या मालत्तेवर टाच

सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना ‘डीएमसीएसएल’कडे पैसे जमा करण्याचे प्रलोभन दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे. गेल्यावर्षी ईडीने याप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी छापे टाकले आणि एकूण ११ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. या प्रकरणात आतापर्यंत १,४३३ कोटी ४८ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आली आहे.

‘द कुटे ग्रुप’मध्ये रक्कम वळती

  • गैरव्यवहारातील निधीचा संस्था व्यवस्थापनाने गैरवापर करून अपहार केला. सुरेश कुटे आणि इतरांनी कट रचून २,४६७ कोटींची रक्कम ‘द कुटे ग्रुप’च्या विविध कंपन्यांना कर्जाच्या स्वरूपात अवैध आणि फसवणूक पद्धतीने वळवल्याची माहिती ‘ईडी’कडून देण्यात आली.
  • बनावट कर्ज रकमेच्या वितरणानंतर, या रकमा ‘द कुटे ग्रुप’च्या विविध कंपन्यांच्या खात्यांमार्फत किंवा थेट रोख स्वरूपात काढण्यात आल्या. सोसायटीकडून मिळालेला हा निधी नवीन व्यवसायात गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि व्यक्तिगत खर्च यासाठी वापरण्यात आला.