मुंबई – कॉंंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता कॉंग्रेसपक्षात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यामुळे कॉंग्रेसला मोठे नुकसान सोसावे लागणार असून पक्षश्रेष्ठींनी यातून चर्चा करून काहीतरी मार्ग काढायला हवा होता, अशी प्रतिक्रिया देत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित झाल्यामुळे कॉंग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता कॉंग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देवरा कुटुंब आणि कॉंग्रेस यांचे अतिशय जवळचे नाते असताना आता मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रसचे लोकप्रतिनिधी देऊ लागले आहेत.

हेही वाचा – मुंबई : अर्धवट सोडलेले शहरातील चार प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता! कायद्यातील नव्या तरतुदीनुसार कारवाई

देवरा यांनी पक्ष सोडल्यामुळे केवळ लोकसभेलाच नाही तर पुढील विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्येही कॉंग्रेसला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. देवरा यांच्यासह अनेक कार्यकर्ते, त्यांना मानणारे लोक, देवरा कुटुंबाशी संबंध असलेले उच्चभ्रू हे देखील कॉंग्रेसपासून दुरावणार असल्याची प्रतिक्रिया पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला माहिती नाही..”

रवी राजा यांनी समाजमाध्यमांवरून आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्या राजकीय कारकिर्दीला वळण देण्यात मुरली देवरा यांचा मोठा वाटा असून आपले व्यक्तिगत खूप नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना देवरा यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला खूप गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने काहीतरी मार्ग काढून मिलिंद देवरा यांना रोखायला हवे होते, असेही मत राजा यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केले आहे. कॉंग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद करायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts should have been made to stop milind deora reaction of former opposition leader ravi raja mumbai print news ssb