मनोहर पर्रिकर यांचा निर्धार

शेजाऱ्यांची कुरापत काढण्यापेक्षा आपल्याकडे पाहण्याची हिंमत इतरांना होऊ नये यासाठी भारताला सामथ्र्यवान बनवायचे आहे, असा निर्धार संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी व्यक्त केला.
वांद्रे रेक्लेमेशन येथे २४ ते २६ डिसेंबर दरम्यान अभाविपचे ५० वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त या वेळी उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते.
गेली १५-२० वर्षे महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. पण शिक्षणव्यवस्थेत जोपर्यंत चारित्र्य, नम्रता यांना महत्त्व दिले जाणार नाही, तोपर्यंत ज्ञान आणि संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. संघामुळेच माझे व्यक्तिमत्त्व घडले असून माझ्या राहणीमानातील साधेपणा हा तिथून आला आहे. सर्वच राजकारण्यांनी साधेपणाने राहायला हवे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या अधिवेशनात महाराष्ट्रभरातील सुमारे तीन हजार विद्यार्थी, कार्यकर्ते व नेते सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात विविध कार्यक्रम व निरनिराळ्या विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अभाविपतर्फे प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या वेळी संघटनेचे माजी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader