Eid-e-Milad holiday Mumbai: ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द केली आहे. या दोन जिल्ह्यांत आता बुधवार, १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून या निर्णयाची माहिती दिली आहे. काही मुस्लीम संघटना आणि लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत चतुर्दशीचा सण मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी येत आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळते. तसेच आदल्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम धर्मीयांकडून जुलूस काढण्यात येत असतात. दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे काही मुस्लीम धर्मीय नेत्यांनी सोमवारी असलेली सुट्टी ही बुधवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

हे वाचा >> ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावरील बंदीची मागणी; जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय –

ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोमवारची (१६ सप्टेंबर) शासकीय सुट्टी दिनांक १८ सप्टेंबर रोजी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी द्यावी, अशी मागणी केली होती. नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलादचे जुलूस १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून दोन्ही समाजाला त्यांचे सण शांततेत साजरे करता येतील.

सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम समाजाने जुलूस काढण्यासाठी ईद-ए-मिलादचा दिवस सोडून दुसऱ्या दिवसाची निवड केली आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजाला शांततेत आपले सण साजरे करता यावेत, तसेच यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eid e milad holiday in mumbai not on september 16 maharashtra govt reschedules here is why kvg