मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईतील तब्बल आठ उमेदवारांना एक लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. यामध्ये भाजपच्या पाच, तर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) दोन उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे नसीम खान यांचाही समावेश आहे. या लखपती उमेदवारांमध्ये सगळ्यात प्रथम क्रमांकावर बोरिवलीतील संजय उपाध्याय आहेत. तर उर्वरित उमेदवारांमध्ये मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा, मुलुंडचे मिहीर कोटेचा, कांदिवलीचे अतुल भातखळकर, चांदिवलीचे योगेश सागर, चांदिवलीचे दिलीप लांडे आणि नसीम खान, मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघावर कोणाचे वर्चस्व याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे शिवसेनेच्या दोन गटातही वर्चस्वाची लढाई झाली. सगळ्याच पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखले, मात्र बहुतांशी ठिकाणी विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमध्ये फारसा फरक नाही. मात्र मुंबईतील ३६ पैकी सात मतदारसंघांमधील उमेदवारांनी एक लाखांपेक्षाही अधिक मते घेतली आहेत. त्यापैकी चांदिवली या सर्वात जास्त लोकसंख्येच्या मतदारसंघात, तर विजयी आणि पराभूत उमेदवार अशा दोघांनाही एक लाखांपेक्षाही अधिक मते मिळाली आहेत.
यामध्ये सर्वाधिक मते बोरिवलीतील भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना मिळाली आहेत. बोरिवली हा भाजपचा बालेकिल्ला असून या ठिकाणी भाजपचा कोणताही उमेदवार असला तरी तो मोठ्या मताधिक्याने निवडून येतो. उपाध्याय यांनी या मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना १ लाख ३९ हजारापेक्षाही अधिक मते मिळाली आहेत. तर मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या तुलनेत टक्केवारीचा विचार करता मलबार हिल मतदारसंघाचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांना सर्वाधिक ७३ टक्के मते मिळाली आहेत.
हेही वाचा – मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार
मतदारसंघ उमेदवार मते
मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप) १,०१,९७
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) १,१४,२०३
चारकोप योगेश सागर (भाजप) १,२७,३५५
बोरिवली संजय उपाध्याय (भाजप) १,३९,९४७
मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना -शिंदे गट) १,०५,५२७
चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना-शिंदे गट) १,२४,६४१
नसीम खान (कॉंग्रेस) १,०४,०१६
मुलुंड मिहीर कोटेचा (भाजप) १,३१,५४९