समाजाच्या सर्व थरातील आणि राज्याच्या सर्व भागातील जनमानसात अढळ स्थान मिळविलेल्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महानायकाची अंत्ययात्रा त्या दिमाखाला साजेशीच होती. ‘मातोश्री’ ते ‘शिवतीर्थ’ हा केवळ पाच किमीचा प्रवास. पण लाखो डबडबलेल्या डोळ्यांचे अभिवादन झेलत झालेल्या या महायात्रेला तब्बल आठ तास लागले. लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर ही विराट अंत्ययात्रा निघाल्याची आठवण आजही सांगितली जाते. त्या वेळेपेक्षाही गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित करीत शतकातील विराट अशा या अखेरच्या प्रवासासाठी निघालेल्या महायात्रेची शिवतीर्थावर सांगता झाली आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने विराट जनसागराने लाडक्या शिवसेनाप्रमुखांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला.
शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सकाळी सात वाजता निघण्याचे जाहीर झाल्याने हजारो कार्यकर्ते रात्रभर आणि पहाटेपासूनच मातोश्री निवासस्थानाबाहेर रस्त्यावर ठाण मांडून होते. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार असल्याने पोलिसांनी पार्थिवाभोवती राष्ट्रध्वज लपेटून मानवंदना दिली. लाखो पावलांच्या सोबतीने महायात्रेचा प्रवास सकाळी सव्वानऊनंतर सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा तर गर्दी होतीच, पण प्रत्येक इमारतीची गॅलरी, गच्ची, पाण्याच्या टाक्या, पत्रे आणि अगदी झाडांवरही हजारो लोक उभे होते. रस्त्यावरही पाय ठेवायला जागा नव्हती आणि काही वेळा रेटारेटी सुरू होती. शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव असलेल्या गाडीला स्पर्श करायला मिळावा, अशी प्रत्येकाची धडपड सुरू होती. त्यामुळे काहीवेळा रेटारेटी होत होती आणि वारंवार कार्यकर्त्यांना आवरावे लागत होते. देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील प्रसिध्दीमाध्यमे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असल्याने शिवसेनेची शिस्त सर्वाना दिसली पाहिजे, कोणताही अनुचित प्रकार होता कामा नये, असे नेतेमंडळी कार्यकर्त्यांना वारंवार बजावत होती. जणू सर्व मुंबईत दादर परिसरातील रस्त्यांवर लोटली असल्याचे चित्र होते. एवढे प्रेम क्वचितच एखाद्या राजकीय नेत्याच्या वाटय़ाला आले असेल.
शिवसेनाभवनच्या गडकरी चौकात आणि नंतर शिवसेनाभवनात काही वेळ गेल्यावर अंत्ययात्रा पुन्हा शिवतीर्थाकडे मार्गस्थ झाली. अंत्यसंस्कारासाठी देशभरातून सर्वपक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. लाखोंचा जनसमुदाय शिवाजी पार्क परिसरात होता. मुंगीच्या पावलाने शिवतीर्थाकडे मार्गक्रमणा सुरू होती. अखेर तब्बल आठ तासांनी या महायात्रेची सांगता झाली. या शतकातील सर्वात मोठय़ा अंत्ययात्रेत सामील झालेल्या प्रत्येकाने आपल्या ‘साहेबांची’ छबी डोळ्यात टिपून आणि मनाशी बाळगून जडावलेल्या अंतकरणाने निरोप दिला.
आठ तासांच्या महायात्रेत गर्दीचा विक्रमी उच्चांक!
समाजाच्या सर्व थरातील आणि राज्याच्या सर्व भागातील जनमानसात अढळ स्थान मिळविलेल्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महानायकाची अंत्ययात्रा त्या दिमाखाला साजेशीच होती. ‘मातोश्री’ ते ‘शिवतीर्थ’ हा केवळ पाच किमीचा प्रवास. पण लाखो डबडबलेल्या डोळ्यांचे अभिवादन झेलत झालेल्या या महायात्रेला तब्बल आठ तास लागले.
First published on: 19-11-2012 at 01:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight hours of funeral procession and lakhs of people