मुंबईः घाटकोपर पश्चिम येथे मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये सहा महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. जखमींपैकी एकाचा प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण येथून १५ ते १६ जणांना घेऊन छोटा टेम्पो निघाला होता. हे सर्व जण मासळी विक्रेते असून ते कुलाबा मार्केटमध्ये मासळी आणण्यासाठी जात होते. पहाटे पावणेतीनच्या सुमारास टेम्पोचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाला. रमाबाई नगर येथे घाटकोपर पुलाजवळील नालंदा येथे हा अपघात घडला. याबाबत माहिती मिळताच पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात सहा महिला व दोन पुरूष जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी सहा महिला व एका पुरूषावर वैद्यकीय उपाचार करून घरी पाठविण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी एक पुरूष गंभीर जखमी असून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.