‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी ८ ज्ञानपीठ विजेत्यांच्या मुलाखतींचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले आहे. ही चित्रफीत साहित्य संमेलनाच्या चार दिवसांच्या दरम्यान दाखवण्यात येणार आहे.
यामध्ये सीताकांत महापात्र (१९९३) भुवनेश्वर, एम. टी. वासुदेव नायर (१९९५), रहमान राही (२००४) श्रीनगर, कुवर नारायण (२००५) दिल्ली, सत्यव्रत शास्त्री (२००६) दिल्ली, चंद्रशेखर कम्बार (२०१०) बंगळूर, प्रतिभा राव (२०११) भुवनेश्वर, केदारनाथ सिंह (२०१३) दिल्ली या ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. ‘८९ व्या मराठी साहित्य संमेलना’च्या आयोजकांकडून मुलाखतीच्या प्रकल्पासाठी काही गट नेमण्यात आले होते. या गटांनी ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या जीवन व साहित्य प्रवासाविषयी संवाद साधला. त्यातून प्रत्येक साहित्यिकाची २ ते ३ तासांची मुलाखत घेण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे यापैकी केदारनाथ सिंह, सत्यव्रत शास्त्री, रहमान राही, सीताकांत महापात्र हे ज्ञानपीठ विजेते साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या वेळी ज्ञानपीठ विजेत्यांसोबत संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या वेळी ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचे स्वागताध्यक्षांनी सांगितले.
नेमाडेंची मुलाखत?
ज्ञानपीठ विजेत्यांच्या मुलाखतीच्या यादीत मात्र भालचंद्र नेमाडे यांचे नाव नाही. त्यांच्या मुलाखतीसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच भालचंद्र नेमाडे मुलाखतीसाठी वेळ देतील अशी आशा साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलनाच्या स्वरूपालाच विरोध करणारे नेमाडे संमेलनाच्या आयोजकांकडून सुरू केलेल्या मुलाखतीच्या प्रकल्पासाठी वेळ देतील का? हा प्रश्नच आहे.