मुंबई : पंतप्रधान आवास योजनेत राज्यातील ४०९ शहरांत १९ लाख ४० हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असले तरी आतापर्यंत फक्त आठ लाख ४२ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत १६३० प्रकल्पात १३ लाख ६५ हजार घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ११ लाख १६ हजार घरांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे.

राज्यात सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) स्थापनेपासून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाच लाख पाच हजार ८०२ घरे बांधली आहेत. यामध्ये पुनर्विकास प्रकल्पात मिळालेल्या घरांचाही समावेश आहे. २०२३-२४ या वर्षांत म्हाडाने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ११ हजार ७२५ घरांची निर्मिती केली. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार ४७१ घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याशिवाय शहर व औद्याोगिक विकास महामंडळाकडूनही (सिडको) राज्यात गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. स्थापनेपासून मार्च २०२४ पर्यंत सिडकोने दोन लाख सहा हजार १३२ घरे बांधली आहेत. नवी मुंबई (७४ हजार ६९२), नाशिक (२१ हजार ३४३), छत्रपती संभाजीनगर (१९ हजार ५०१) आणि नांदेड (सात हजार ७५८) या शहरात सिडकोने अत्यल्प तसेच अल्प उत्पन्न गटासाठी एक लाख २३ हजार २९४ घरांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा >>>कृषी क्षेत्राची घसरगुंडी, दरडोई उत्पन्नात घसरण, वीजनिर्मितीतही घट

● पंतप्रधान आवास योजना (नागरी) अंतर्गत सिडकोने २०२०-२१ पर्यंत १५ हजार ४३२ घरे बांधली होती. या योजनेत सिडकोसाठी ८६ हजार ९६१ घरांचे उद्दिष्ट असून त्यापैकी मार्च २०२४ अखेर सात हजार ८२१ घरे बांधून पूर्ण झाली असून ४४ हजार ८७३ घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

● झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मार्च २०२४ पर्यंत दोन हजार ३५३ प्रकल्प पूर्ण झाले असून झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन लाख ५७ हजार ४०३ कुटुंबीयांचे पुनर्वसन झाले आहे.