मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिली मेट्रो गाडी ऑगस्टच्या सुरुवातीला मुंबईत दाखल झाली. याच गाडीची मंगळवारी यशस्वीपणे चाचणी सुरू झाली. आता वर्षभरात आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथून आणखी आठ गाडय़ा मुंबईत दाखल होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) २०१७-२०१८ मध्ये ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाडय़ांची बांधणी करण्याचे कंत्राट श्रीसिटीतील एका कंपनीला दिले आहे. हे कंत्राट २५१६ कोटी रुपयांचे आहे. या कंत्राटानुसार श्रीसिटीमध्ये ‘मेट्रो ३’साठी पहिल्या मेट्रो गाडीची बांधणी करण्यात आली. आता हळूहळू अन्य मेट्रो गाडय़ांची बांधणी सुरू झाली. मात्र, या प्रकल्पातील आरे वसाहतीत होऊ घातलेल्या कारशेडचा वाद चिघळला आणि कारशेडचे काम रखडले. परिणामी, गाडय़ा ठेवण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि संबंधित कंपनीने गाडय़ांची बांधणी बंद केली. दरम्यानच्या काळात एका गाडीच्या बांधणीचे काम पूर्ण झाले होते. 

या पार्श्वभूमीवर किमान एक गाडी मुंबईत आणून तिची चाचणी करण्यासाठी एमएमआरसीने मरोळ-मरोशी येथील सारिपूत नगरमध्ये तात्पुरती कारशेड बांधण्याची परवानगी मागितली होती. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी परवानगी दिली आणि तात्पुरत्या कारशेडचे काम पूर्ण करून अखेर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दोन टप्प्यात पहिली गाडी सारिपूत नगरमध्ये दाखल झाली. या गाडीची जोडणी आणि इतर कामे करून मंगळवारी यशस्वीपणे चाचणीस सुरुवात करण्यात आली. आता पुढील सहा महिने ही चाचणी सुरू राहील. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रकिया पूर्ण करून डिसेंबरमध्ये आरे कारशेड ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी एकूण ९ गाडय़ा लागणार आहेत. त्यामुळे वर्षभरात आणखी ८ गाडय़ा मुंबईत आणण्यात येतील, अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी चाचणीच्या वेळी दिली.

नऊपैकी एक गाडी मुंबईत दाखल झाली असून सध्या चार गाडय़ांचे काम सुरू आहे. उर्वरित तीन गाडय़ांचे काम लवकरच हाती घेतले जाईल. डिसेंबर २०२३ ला पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात उर्वरित गाडय़ा मुंबईत आणून त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. या गाडय़ा ठेवण्यासाठी आरे कारशेडचे काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.

मेट्रो गाडीची वैशिष्टय़े

* आठ डब्यांची गाडी

* १८० मीटर लांब गाडी

* ३.२ मीटर रुंद गाडी

* एकूण प्रवासी क्षमता २४००

* वेग ताशी ८५ किमी

* स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आल्याने गाडी ३५ वर्षे टिकणार

*  रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल

*  पूर्णत: वातानुकूलित गाडी

* स्वयंचलित गाडी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight more metro trains will come to mumbai in a year zws