मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २६ टप्प्यांत ८२ निविदा सादर झाल्या आहेत. त्यात निवडणूक रोखे खरेदीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेघा इंजिनियरिंग कंपनीच्या आठ निविदांचा समावेश आहे. या कंपनीने बहुउद्देशीय मार्गिकेसाठी तीन तर पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी पाच निविदा सादर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएसआरडीसीने वर्षभरापूर्वी बहुउद्देशीय मार्गिकेसाठी ११ टप्प्यांत, पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी नऊ टप्प्यांत आणि जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत अशा एकूण २६ टप्प्यांत स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. एमएसआरडीसीच्या स्वारस्य निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यातील १९ कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यानुसार या पात्र निविदाकारांकडून एमएसआरडीसीने आर्थिक निविदा मागविल्या होत्या. त्या गुरुवारी खुल्या करण्यात आल्या. यावेळी १९ पैकी १८ कंपन्यांनी निविदा सादर केल्या. २६ टप्प्यांसाठी या कंपन्यांकडून एकूण ८२ निविदा सादर झाल्या आहेत.

हेही वाचा –  ‘मोदी मित्र’च्या आडून भाजपची मते वाढविण्याचा प्रयोग!

या ८२ निविदांमधील आठ या मेघा इंजिनिअरिंगच्या आहेत. मेघा इंजिनिअरिंग कंपनी ही सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या कंपन्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीने तब्बल ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे समोर आले आहे. या कंपनीला मागील काही वर्षांत राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठीची कंत्राटे दिली गेली आहेत. समृद्धी महामार्गातील एका टप्प्याचे काम या कंपनीने केले आहे तर मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी अशा बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे कंत्राटही मेघा इंजिनिअरिंगला मिळाले आहे. आता यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण आता या कंपनीने एमएसआरडीसीच्या दोन महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पासाठी आठ निविदा सादर केल्या आहेत. पुणे वर्तुळाकार प्रकल्पासाठी नऊ टप्प्यांत २६ निविदा सादर झाल्या आहेत. त्यातील पाच निविदा मेघा इंजिनिअरिंगच्या आहेत. तर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील नवघर ते बलवली या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सादर झालेल्या निविदेत मेघा इंजिनिअरिंगच्या तीन निविदांचा समावेश आहे. या कंपनीने जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी मात्र एकही निविदा सादर केलेली नाही.

हेही वाचा – जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत

एमएसआरडीसीकडून आता सादर झालेल्या आर्थिक निविदांची छाननी करण्यात येणार आहे. तर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये निविदा अंतिम करण्यात येणार आहेत. तेव्हा मेघा इंजिनिअरिंग कंपनीला किती कंत्राट मिळतात हे स्पष्ट होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight tenders by megha engineering for two projects of msrdc second largest company in buying electoral bonds mumbai print news ssb
Show comments